रसायनी : प्रतिनिधी
वीज बिलाचा भरणा करण्यासाठी उन्हातान्हातून बँकेत गेलेल्या नागरिकांना नेट बंद असल्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून बँकेने कोणताच पर्याय न ठेवल्याने नागरिक संतप्त आहेत. वीज बिलाचा भरणा करण्याची सोय खालापूर येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहे. तालुक्यातील अनेक भागातून नागरिक मोठ्या संख्येने वीज बिल भरणा करण्यासाठी येतात. एप्रिल महिन्यात आलेल्या सुट्या यामुळे बँकेचे कामकाज या महिन्यात कमी दिवस होते. त्यातच सोमवारी लोकसभा निवडणूक आणि बुधवार 1 मे महाराष्ट्र दिनाची सुटी यामुळे मंगळवारी वीज बिल भरणा करण्यासाठी बँकेत रांग लागली होती, परंतु दुपारी 2 नंतर नेट सेवा खंडित झाल्यामुळे वीज बिल भरणा थांबविण्यात आला.थोड्या वेळाने नेट पूर्ववत होईल म्हणून नागरिक थांबून राहिले, परंतु बँकेच्या कामकाजाची वेळ संपली तरी नेट सुरू न झाल्याने नागरिकांना आल्या पावली माघारी जावे लागले. तास दीड तास थांबूनसुद्धा वीज बिल भरणा न झाल्यामुळे नागरिक वैतागले असून उन्हाचा ताप त्यात नेटचा ताप अशी संतापाची भावना व्यक्त करत होते. वीज बिल भरणा करण्यासाठी आणि बँकेच्या इतर व्यवहारासाठी एकच रांग असून वीज बिलासाठी उभे असलेल्या नागरिकांना डावलून पैसे काढण्यासाठी किंवा भरणा करण्यासाठी आलेल्या ग्राहकाला प्राधान्य देत रांगेतील व्यक्तीना डावलले जात असल्यामुळे देखील नाराजी आहे. नेट नसेल तर जुन्या पद्धतीने वीज बिल भरण्याची सोय ठेवायला हवी, अशी मागणी या वेळी वृद्ध व्यक्ती व महिलांनी व्यक्त केली.
RamPrahar – The Panvel Daily Paper