उद्या पदवीदान समारंभ

नवी मुंबई : प्रतिनिधी
खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा सत्याग्रह सप्ताह सुरू आहे. यात जाहीर परिसंवाद, व्याख्यानमाला, एक शाम सत्याग्रह के नाम आदी समारंभात सुरू आहे. रविवारी (दि. 20) सकाळी सीबीडी येथील सम्राट अशोक महाविहारातून महाड येथील चवदार तळे येथे सत्याग्रह ज्योत घेऊन उपासक सुंदर वसावे, गोविंद बनसोडे, एम. एल. सूर्यवंशी यासह अनुयायांनी प्रस्थान केले. मंगळवारी (दि. 22) दुपारी 3 वाजता खारघर येथील शांताराम रामराव सभागृहात पदवीदान समारंभ होणार आहे.
सत्याग्रह सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर महाडचा धर्म संगर आणि हिंदूंची परिवर्तनवादी भूमिका यावर परिसंवाद झाला. प्रो. संगीता जोगदंड, विकास मोरे, संदीप गोयंका यांनी या वेळी आपले विचार मांडले.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरायांचे ज्वलंत विचार देशाला महाशक्तिशाली बनविणारे आहेत. संविधानिक हक्क आणि त्यासाठीचा लढा यापुढच्या काळात लढण्याची शपथ नवतरुणांनी घ्यावी. महाराष्ट्र शासनाच्या कोकण विभागीय समाजकल्याण उपायुक्त वंदना कोचुरे यांनी संविधान स्तंभ पायाभरणी केली. अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. प्रतिभा शंकरराव यांनीही आपले विचार मांडले.
सत्याग्रह महाविद्यालय, सिद्धार्थ शाळा आणि नवी मुंबईतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एम. एल. सूर्यवंशी, वनिता सूर्यवंशी यांनी या वेळी मोलाचे सहकार्य केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper