नगरसेविका वृषाली वाघमारे आक्रमक; कारवाईची मागणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवीन पनवेलमधील एका रेशनिंगच्या दुकानात निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप केल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे. याबाबत महापालिका प्रभाग ड समिती सभापती व स्थानिक नगरसेविका वृषाली वाघमारे आक्रमक झाल्या असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे कारवाई झाली नाही, तर आंदोलनाचा इशाराही दिला आहे. नवीन पनवेल येथील सेक्टर 13मधील रेशनिंग दुकानात निकृष्ट दर्जाचे धान्य लाभार्थ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी तहसील कार्यालयात धान्य पुरवठा अधिकारी प्रदीप कांबळे यांची भेट घेतली तसेच त्यांच्यासमवेत रेशन दुकानात सर्व धान्याची तपासणी करण्यात आली. दोषींवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी या वेळी त्यांनी केली असून असे न झाल्यास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्व जनतेसमवेत आंदोलन करू, असा इशाराही दिला आहे. या वेळी महिला मोर्चा शहराध्यक्ष वर्षा नाईक, भाजप नेते रवींद्र नाईक, आणि ग्राहक उपस्थित होते.
चांगल्या दर्जाचे धान्य मिळावे!
राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे गोरगरीब जनतेला निकृष्ट दर्जाचे धान्य देऊन त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. त्यामुळे या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर उत्कृष्ट दर्जाचे व योग्य पद्धतीने धान्य देण्यात यावे आणि या प्रकरणांमधील दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी तहसील कार्यालयात करण्यात आली. त्यावर निष्कृष्ट धान्य वितरित झाले ते बदलून देण्यात येईल, असे सांगण्यात आले.