समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी पसंती
पाली : प्रतिनिधी
कोकणातील मुंबई व पुण्याजवळचा जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य व मनमोहक गारवा देणार्या स्थळांना पर्यटक मोठी पसंती देत आहेत. त्यामुळे सागरी किनारे व अन्य पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत.
शनिवार व रविवार सलग लागून आलेल्या सुट्यांमध्ये पर्यटक एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडतात. रायगडात समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, किल्ले, तीर्थक्षेत्र असे बरेच काही आहे. ते पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढत आहे. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व लॉज व्यावसायिक, खानावळी, दुकानदार यांचीही सध्या खूप चलती आहे.
अष्टविनायकांपैकी दोन गणपती हे रायगडमध्ये आहेत. ते म्हणजे खालापूर तालुक्यातील महडचा वरदविनायक आणि सुधागड तालुक्यातील पालीचा बल्लाळेश्वर. सध्या येथे भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला शिवप्रेमींची पसंती असते. मुरूड आणि अलिबाग समुद्रकिनार्यांची मजा लूटतानाच पर्यटक येथे असलेल्या जंजिरा आणि कुलाबा किल्ल्याला आवर्जून भेट देतात आणि तिथला इतिहास जाणून घेत आहेत. ओहटीच्या वेळी कुलाबा किल्ल्यावर चालत किंवा घोडागाडीने जाता येते, तर भरतीच्या वेळी किल्ल्यावर जाण्यासाठी मोटारबोटची व्यवस्था आहे. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठीही फेरीबोटींच्या फेर्या सुरू असतात.
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वरला पर्यटकांसह भाविकांचीही पसंती असते. कारण एकाच ठिकाणी भव्यसमुद्र किनारा आणि देवदर्शन अशा दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम तेथे साधता येतो. महाराष्ट्र पर्यटन विभागाने (एमटीडीसी) येथे पर्यटकांसाठी राहण्याची सोय केली आहे तसेच खाजगी लॉजसुद्धा उपलब्ध आहेत. तेथूनच दिवेआगर आणि श्रीवर्धनच्या समुद्रकिनार्यावर जाता येते.
उरणजवळील घारापुरी बेटावर अजंठा लेणी पाहण्यासाठी कलाप्रेमींची गर्दी होत आहे. येथे जाण्यासाठी उरण व गेटवे ऑफ इंडियावरून फेरी बोटीची सेवा उपलब्ध आहे.
बीचकडे अधिक ओढा
जिल्ह्याला विस्तृत समुद्र किनारा लाभला आहे. यामध्ये अलिबाग- नागाव, वरसोली, मुरूड, काशिद, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतात. वाढत्या उष्म्यामुळे समुद्रात मनसोक्त डुंबण्याचा आनंद पर्यटक लुटत आहेत. अनेक किनार्यांवर पर्यटक बोटिंग, घोडागाडी, बाईक राईडची मजा लुटत आहेत. त्याचप्रमाणे ताजी मासळी आणि हापूस आंबे खाण्यावर ताव मारत आहेत. समुद्रकिनार्यांव्यतिरिक्त उन्हाचा जोर वाढला असल्याने जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण माथेरान पर्यटकांनी बहरले आहे. सर्वसामान्य दिवसांपेक्षा वीकेण्डला येथे अधिक गर्दी असते.
RamPrahar – The Panvel Daily Paper