सांडपाण्यासोबत वाहत असलेल्या शेवाळामुळे नेरळ परिसरातील पाण्यावर पसरली हिरवळ
कर्जत : बातमीदार
बारमाही वाहणारी उल्हास नदी नेहमीप्रमाणे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. शेवाळ आणि जलपर्णीमुळे प्रामुख्याने वाकस पुलापासून ठाणे जिल्हा हद्दीपर्यंतच्या नदीपात्रातील पाणी हिरवेगार दिसू लागले आहे.
खंडाळाच्या बोरघाटातून उगम पावणारी उल्हास नदी पुढे कर्जत तालुक्यातून वाहत जाऊन ठाणे जिल्ह्यात पोहचते. या नदीवर ठाणे जिल्ह्यातील काही शहरांच्या नळपाणी योजना आणि औद्योगिक वसाहत यांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून नदीत वाहत येणार्या सांडपाण्यामुळे उल्हास नदी प्रदूषित झाली आहे. त्यात नदीतील पाण्यावर जलपर्णी यांचा प्रभाव दिसून येत आहे. जानेवारी महिन्यापासून नदीच्या पात्रात जलपर्णी दिसून यायच्या. यावर कर्जत येथील उल्हास नदी निर्मल अभियान अंतर्गत गेली तीन वर्षे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या स्वच्छता मोहिमेमुळे कर्जत येथून वाहून येणार्या जलपर्णीची समस्या कमी झाली होती. पुढे नेरळपासून ठाणे जिल्हा हद्दीपर्यंत कृषिभूषण शेखर भडसावळे यांच्या सगुणा रुरल फाउंडेशनने उल्हास नदी जलपर्णी मुक्त करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम राबविल्याने जलपर्णींचे प्रदूषण कमी झाले आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून उल्हास नदीच्या पात्रातील पाणी हिरव्यागार थराने व्यापले आहे.त्यामुळे वाकस पुलापासून नेरळ दहिवली पूल आणि पुढे शेलूपर्यंत नदीच्या पात्रात स्वच्छ पाणी दिसून येत नाही. या वेळी जलपर्णीपेक्षा नदीमधील सांडपाण्यासोबत वहात येणार्या शेवाळाने पाण्यावर हिरवा थर तयार झाला आहे. परिणामी नदीमध्ये अंघोळ करणार्यांच्या अंगाला खाज येत असून नदीचे पाणीदेखील हिरवेगार झाले आहे.
कर्जत शहरात स्वच्छता मोहीम सुरू असली तरी शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी कोणतीही यंत्रणा नगरपालिकेकडे नाही. पुढे तालुक्यातील अन्य मोठ्या गावांतील सांडपाणी वाहून नेणारी गटारेदेखील उल्हासन दीच्या प्रदूषणातील मोठी समस्या बनली आहेत. यावर प्रशासनाने निर्बंध आणण्याची गरज आहे. असे मत तळवडे येथील कार्यकर्ते आत्माराम घोडविंदे यांनी व्यक्त केले आहे.
नदीतील जलपर्णीचा सर्वांनी मिळून बंदोबस्त केला आहे. आता शेवाळही उल्हास नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे. गटारातून वाहत येणारे सांडपाणी प्रक्रिया करूनच पुढे उल्हास नदीत सोडले पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी स्वत:हून बंधने घालून घेतली पाहिजेत.
-शेखर भडसावळे, सगुणा रुरल फाउंडेशन, नेरळ
RamPrahar – The Panvel Daily Paper