Breaking News

पुढचा नंबर हसन मुश्रीफांचा!

भाजप नेते किरीट सोमय्यांचा इशारा

मुंबई ः प्रतिनिधी

भ्रष्टाचार्‍यांचे कर्दनकाळ भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता आणखी एका मंत्र्याचा घोटाळा उघडकीस आणण्याचा इशारा दिला आहे. येत्या शुक्रवारी पुण्यात जाणार असून हसन मुश्रीफ यांच्यासंदर्भात हा दौरा असेल, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढत आहेत. नुकताच त्यांनी दापोली दौरा केला. परिवहनमंत्री आणि शिवसेना नेेते अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी प्रतिकात्मक हातोडा घेऊन ते दापोलीत गेले होते. या दौर्‍यानंतर सोमय्यांच्या रडारवर कोण, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. त्याचवेळी सोमय्या यांनी थेट हसन मुश्रीफ यांचे नाव घेतले आहे. पुढील दौरा एप्रिलमध्ये होणार आहे, पण तत्पूर्वी पुण्यात जाणार आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाच्या पथकाने छापा मारला होता. या छाप्यात अधिकार्‍यांच्या हाती एक डायरी लागली. त्या डायरीत ’मातोश्री’ला दोन कोटी रुपयांची भेट आणि 50 लाख रुपयांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख आहे. यावरून माफिया सेना स्वतःला वाचवण्यासाठी आता यशवंत जाधवांच्या आईचे नाव घेत आहेत, असे सोमय्या म्हणाले. जाधव आपल्या आईला 50 लाख रुपयांचे घड्याळ देणार का, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

’डर्टी डझन’ जेल किंवा हॉस्पिटलमध्ये

महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. त्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सरकार 50 वर्षे चालू दे, पण महाराष्ट्राच्या जनतेला लुटणारा माफिया 50 दिवसांत सरळ होणार, असा इशारा सोमय्यांनी दिला. आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. आता कारवाया आणि न्यायालयीन आदेशाला गती आली आहे. पुढील 50 दिवसांत ’डर्टी डझन’ एकतर जेल, बेल किंवा रुग्णालयात असतील. महाराष्ट्राला घोटाळामुक्त करणे हे आमचे लक्ष्य आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply