भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
मुंबई ः प्रतिनिधी
विरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा भाजपच जिंकेल, असा आत्मविश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मुंबईत व्यक्त केला.
भाजप प्रदेश कार्यालयात ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि प्रवक्ते गणेश हाके उपस्थित होते. भाजप बूथपातळीपर्यंत भक्कम संघटनात्मक बांधणी करीत आहे. त्याच्या जोरावर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहचवू. मोदीजींची लोकप्रियता, त्यांच्या सरकारचे काम आणि भाजपची संघटनात्मक शक्ती यामुळे आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जिंकतील.
त्यांनी सांगितले की, केवळ सत्तेसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे घटकपक्ष एकत्र राहिले असले तरी त्यांच्यातील विसंवाद सतत समोर येत आहे. काँग्रेसचे आमदार नाराज आहेत. शिवसेनेच्या पंचवीस आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निधी वाटपातील अन्यायाबद्दल पत्र लिहिले. प्रशासनाची वाताहत झाली आहे. या सगळ्यात जनतेचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. एसटीचा संप, शेतकर्यांचे प्रश्न सोडविले जात नाहीत. त्यामुळे जनता नाराज असल्याचे त्यांनी सांगितले.