माणगाव : प्रतिनिधी
समाजात विविध प्रकारचे वाद-विवाद होत असतात. विशेष:ता ग्रामीण भागातील पक्षकार न्यायाची अपेक्षा करतात. हे वाद, विवाद विद्यार्थ्यांनी त्या त्या ठिकाणी समजून घेऊन सोडविल्यास विद्यार्थ्यांना समाजात काम करण्याची उर्जा मिळेल व पक्षकारांनाही मोफत न्याय मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश विभा इंगळे यांनी शुक्रवारी (दि. 1) माणगाव येथे केले.
माणगाव येथील अशोकदादा साबळे विधी महाविद्यालयातील मोफत कायदेविषयक सल्ला व सहाय्य केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी जिल्हा न्यायाधीश विभा इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या मार्गदर्शन करीत होत्या. वकिलीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थांनी समाजसेवेचे व्रत हाती घेऊन तळागाळातील सर्वसामान्य लोकांना मदत करण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
साबळे विधी महाविद्यालयाचे चेअरमन अॅड. विनोद घायाळ यांनी प्रास्ताविकात मोफत सल्ला व सहाय्य केंद्राचे महत्व विषद केले. या मोफत केंद्राचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, असा सल्ला माणगाव विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एन. एस. कोले यांनी या वेळी दिला.
माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. राजीव साबळे, माणगाव वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. महेंद्र मानकर, सचिव कृष्णा गांधी, नितीन बामुगडे, राजन मेथा, बबन गायकवाड, तटकरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन खामकर यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. साबळे विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या शमा फारुकी आभार मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper