सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडीच्या) मोहिमेमुळे हैराण झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर अखेरचा मार्ग उरला होता, तोदेखील वापरून झाला आहे. महाविकास आघाडीचे जनक शरद पवार यांनी बुधवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाविकास आघाडीची दोन दु:खे त्यांच्या कानावर घातली. अर्थात, अशी डझनावारी दु:खे महाविकास आघाडीच्या पदरी आहेत. त्यापैकी दोनच निवडक दु:खे पवार यांनी मोदी यांच्या कानावर घातली. गेली अडीच वर्षे राज्यपालनियुक्त विधान परिषद सदस्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. सत्ताधारी पक्षाने शिफारस केलेल्या 12 नावांबाबत माननीय राज्यपालांनी अजून निर्णय घेतलेला नाही. तो तातडीने घेण्याबाबत काहीतरी करावे, असे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितल्याचे समजते. याशिवाय शिवसेनेचे प्रवक्ता संजय राऊत यांच्या मालमत्तेवर ईडीने मंगळवारी टाच आणली होती, त्या कारवाईबाबतदेखील पवार यांनी पंतप्रधानांकडे नाराजी व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांच्या नातलगांच्या नावावर असलेली सुमारे साडेअकरा कोटी रुपये किमतीची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ही कारवाई झाल्यानंतर खुद्द राऊत यांनी सारे ताळतंत्र सोडून जी अद्वातद्वा आणि शिवराळ बडबड माध्यमांसमोर येऊन केली ती सार्या महाराष्ट्राने पाहिली आहे. विशेषत: भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्याबद्दल राऊत यांनी जे अपशब्द वापरले ते निषेधार्ह आणि निंदनीय आहेतच. महाविकास आघाडीमधील अंतर्विरोध वाढत चालल्याचे आता स्पष्टपणे दिसून येत आहे. पवार यांनादेखील ते उमगले असणारच. तथापि, आपल्याच पक्षाचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे दोघेही तुरुंगात गेले असताना रदबदली मात्र शिवसेनेच्या नेत्यासाठी केली जाते ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसमध्येदेखील भुवया उंचावणारी ठरेल. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र राऊत यांच्यावरील कारवाईबाबत तोंडदेखील उघडलेले नाही. राऊत हे राज्यसभेचे सदस्य असून संपादकदेखील आहेत. त्यांच्यावरील कारवाईची गरज नव्हती असे पवार यांनी पंतप्रधानांना सांगितल्याचे कळते. राऊत यांची अलीकडची भाषा पवार यांंच्या कानावरून गेली नसावी. अन्यथा त्यांनी राऊत यांना उद्देशून संपादक हे बिरुद वापरले नसते. काहीही असले तरी पवार-मोदी भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकारण अचानक पेटून उठल्यासारखे झाले. या भेटीमध्ये नेमके काय होणार याची उत्कंठा सर्वांनाच लागली होती. अखेर पवार यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन वावड्यांची वावटळ थांबवली हे योग्यच केले. पवार-मोदी भेटीमुळे भाजपच्या नेत्यांमध्येदेखील काही काळ चलबिचल झालेली दिसली, परंतु मोदी यांच्या भेटीत अंतिमत: दोन नेहमीचेच मुद्दे मांडून पवार यांनी नेमके काय साधले अशी चर्चा आता रंगू लागली आहे. मुख्य म्हणजे पवार यांनी भेटीमध्ये मांडलेल्या दोन मुद्द्यांबद्दल जगाला कळले असले तरी या दोन्ही प्रकरणांबद्दल पंतप्रधानांची प्रतिक्रिया काय होती हे मात्र अजुनही गुलदस्त्यातच आहे.
रदबदलीची वेळ
Ramprahar News Team 6th April 2022 महत्वाच्या बातम्या, संपादकीय Leave a comment 254 Views
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper