Breaking News

रोहा पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेतील दोषींवर कारवाई करा

अन्यथा तीव्र आंदोलन; दत्तू वाघ यांचा इशारा

रोहे : प्रतिनिधी

पत्नीच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी रवी वाघमारे याने गुरुवारी पहाटे रोहा येथील पोलीस कोठडीत आत्महत्या केली. घटनेतील दोषींवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य आदिम कातकरी जमाती संघटनेचे अध्यक्ष दत्तू वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिला.

रोहा तालुक्यातील शेणवई आदिवासीवाडी येथील रवी वसंत वाघमारे याने पत्नीशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पत्नी जयश्री वाघमारे हिचा 9 एप्रिल रोजी खून केला होता. त्याला रोहा पोलिसांनी 11 एप्रिल रोजी अटक केली होती. न्यायालयाने त्याला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपीने गुरुवारी पहाटे पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अशोक दुधे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेथे आदिम कातकरी जमाती संघटनेचे अध्यक्ष दत्तू वाघ, जिल्हाध्यक्ष लहू वाघमारे, रोहा तालुका अध्यक्ष पांडुरंग वाघमारे, महिला अध्यक्षा गुलाब वाघमारे, सर्वहारा जन आंदोलनचे सोपान सुतार, एकलव्य आदिवाशी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिवा पवार, आदिवाशी हितरक्षक संघटनेचे  उमेश जाधव, निजामपूर आदिवाशी एकलव्य संघटना नथुराम वाघमारे, रोहा पंचायत समितीचे माजी सभापती गुलाब वाघमारे, बबन कोळी, बेबीताई कापरे, राम कोळी, राम सावट, काशिनाथ निकम,  शशिकांत कोळी, विकास कोळी, विठोबा जाधव, रवी जाधव, एकनाथ वाघे, अंकुश वाघमारे, चंद्रकांत पवार आदी विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दत्तू वाघ यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

रोहा पोलीस स्थानकात घडलेली घटना ही संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे घडली असल्याचा आरोप आम्ही केला आहे. त्यामुळे यामधील दोषींवर तातडीने कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा दत्तू वाघ यांनी या वेळी दिला आहे.

अटकेत असलेली व्यक्ती आत्महत्या करते, हे दुर्दैवी आहे. रोहा पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष व कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली. त्यामुळे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली असल्याचे सोपान सुतार यांनी या वेळी सांगितले.

संपूर्ण चौकशीअंती या घटनेच्या दोषींवर कारवाई करण्यात येईल तसेच मयत आरोपीच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले असल्याची माहिती या वेळी सोपान सुतार यांनी दिली.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply