Breaking News

पोलखोल तर होणारच

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्या आजवरच्या कारभाराची चिरफाड होणार या विचाराने सत्ताधारी भ्रष्टाचार्‍यांच्या गोटात अस्वस्थता पसरणे स्वाभाविकच होते. त्यामुळेच भाजपच्या पोलखोल मोहिमेतील रथाची काही अज्ञातांनी सोमवारी मध्यरात्री तोडफोड केली. भाजपची ही रथयात्रा मंगळवारी मुंबईतील चेंबूर कॅम्प येथील भाजप कार्यालयातून सुरू व्हावयाची होती. अर्थात, भाजप अशा भ्याड हल्ल्यांनी मागे हटणार नाही हे सत्तेच्या खुर्च्यांना चिकटून बसलेल्यांनाही पुरते ठाऊक आहे.

जगाच्या किंवा देशाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यातून मुंबई शहरात आलेल्या माणसाला आल्याक्षणी भावते ती या शहराची मानसिकता, येथील दुर्दम्य जीवनासक्ती. येथील लोकांची मदत करण्याची वृत्ती, शिस्तप्रियता, या शहराचा वेग, त्याचे अखंड कार्यमग्न राहणे सारे-सारे येथे येणार्‍यांना लुभावून जाते. मात्र सगळ्यांनाच खटकते ती या शहराची बकाली, अस्वच्छता, खड्डे पडलेले रस्ते, प्रचंड वाहतूक कोंडी, जिथे पहावे तिथे दिसणारी माणसांची गर्दी आणि सुविधांचा अभाव. देशाच्या अनेक भागांत गेल्या काही वर्षांत मोठी प्रगती झालेली दिसून येते. तेथील स्वच्छ रस्ते, उद्याने, उद्योगधंदे नजरेत भरतात. प्रगतीच्या त्या झपाट्याची मुंबईशी तुलना केली तर मात्र काय दिसते? एक आंतरराष्ट्रीय शहर असूनही मुंबई मात्र बदलताना दिसत नाही. कोणी जखडून, रोखून ठेवले आहे मुंबई शहराला प्रगतीच्या वाटेवर जाण्यापासून? 40 हजार कोटींहून अधिक रूपयांचा अर्थसंकल्प असलेल्या या महानगराची अवस्था अशी दयनीय का? गेली अनेक दशके मुंबई महानगरपालिकेला आपल्या विळख्यात घेऊन बसलेल्या पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा कारभार कसा आहे हे काही लपून राहिलेले नाही. अनेक वर्षे भ्रष्टाचाराचे कुरण बनून राहिलेल्या शिवसेनेच्या येथील सर्व घोटाळ्यांची पोलखोल करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाने केला आहे. या पोलखोल अभियानाची घोषणा होताच शिवसेनेच्या गोटात धाबे दणाणणे अपेक्षितच होते. अलीकडेच एका भ्रष्टाचार प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांच्या 11 मालमत्तांवर टाच आणली. तेव्हापासून शिवसेनेच्या नेत्यांमध्ये घबराटीचेच वातावरण आहे. त्यामुळेच आमचा घाव सत्ताधार्‍यांच्या वर्मी बसल्यामुळे त्या अस्वस्थतेतूनच रात्रीचा हा हल्ला करण्यात आला. परंतु असे कितीही हल्ले झाले तरी भ्रष्टाचाराची पोलखोल भाजप करीतच राहील असा निर्धार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्यानंतर व्यक्त केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते रथयात्रेची सुरूवात होणार होती. गुंडांना हाताशी धरून शिवसेनेने पोलखोल रथाची तोडफोड केल्याचा आरोप दरेकर यांनी केला. तोडफोड करणार्‍या आरोपींना संध्याकाळपर्यंत अटक न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून चौघांची ओळख पटवल्याचे समजते. असे हल्ले भारतीय जनता पक्षाला मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा बुजबुजाट चव्हाट्यावर आणण्यापासून तिळमात्रही रोखू शकणार नाहीत हे तर सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. शिवसेनेने कायम या पालिकेला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असल्यासारखेच वागवले आहे. इतकी वर्षे आपण येथील सत्ता बळकावून आहोत, आपण या शहराचे काही देणे लागतो याचे भान या पक्षाला नाही. ते फक्त हक्काची भाषाच बोलत आले आहेत. या हक्काच्या भावनेतूनच बहुदा त्यांनी या शहराला लुबाडून आपल्या तुंबड्या भरल्या आहेत. परंतु आता त्यांच्या भ्रष्ट कारभाराची लक्तरे वेशीवर टांगल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply