शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट
अलिबाग : प्रतिनिधी
जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेत मिळण्यासाठी सीएमपी वेतन प्रणाली लागू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी पुणे येथे आयुक्तांची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. या बैठकीत झालेल्या विषयांवर मार्ग काढण्याबाबत शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे संघटनेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी सांगितले.
राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेस व्हावे. राज्यभरात सीएमपीप्रणालीद्वारे वेतन सक्ती करण्यात यावी. प्राथमिक शिक्षकांच्या दरमहा वेतन, अर्जित रजा, वैद्यकीय बिलासाठी मागणीप्रमाणे अनुदान उपलब्ध करून द्यावे. पदोन्नती प्रक्रिया दरवर्षी राबविण्यात यावी व त्यात संपूर्ण राज्यभर एकवाक्यता आणावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
राज्यात केंद्र प्रमुखाची किमान 60 टक्के पदे रिक्त आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे.
1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या व दहा वर्षाच्या आत मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या सानुग्रह अनुदानाबाबतच्या प्रस्तावाची गतिमानता वाढविण्यात यावी. 24 वर्ष पूर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ मंजूर होण्यासाठी राज्यभर कृती कार्यक्रम राबविण्यात यावा. सलग बारा वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होण्यासाठी कृती कार्यक्रम आयोजित करण्यात यावे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शिक्षकांना रजा रोखीकरणाचा लाभ मंजूर करावा. 100 टक्के नियुक्त विशेष शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. या विषयांवर चर्चा करण्यात आली.