कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, त्यामुळे सगळ्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे अशी स्पष्ट सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. कोरोना महासाथीसंदर्भात पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून याविषयी काही ठोस निर्देश दिले जातील, अशी अपेक्षा होती, पण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत इतकेच काय ते मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगण्यात आले. सावधगिरीविषयीची जनतेची बेफिकीरी आणि वेळीच योग्य पावले उचलण्याबाबत राज्य सरकारकडून चाललेली चालढकल या दोन्ही बाबी चिंता वाढवणार्या आहेत.
दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशपाठोपाठ गेल्या दोन आठवड्यांत केरळ आणि महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ दिसू लागताच सर्व संबंधितांना परिस्थितीविषयी चिंता वाटू लागणे स्वाभाविक होते. साहजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीने देशभरातील मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक बोलावली. सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा वापर करावा तसेच आरोग्यविषयक पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, असा सल्ला मोदींनी या वेळी दिला. यापूर्वीच्या तिन्ही लाटांमधील अनुभव लक्षात घेता कृत्रिम श्वसनयंत्रे, प्राणवायुचा पुरवठा आदी आरोग्यविषयक सुविधांचे वेगाने आधुनिकीकरण करणे आवश्यक आहेच तसेच चौथ्या लाटेला तोंड द्यावे लागलेच तर आवश्यक मनुष्यबळ विकसित करण्याच्या दृष्टीनेही कामाला लागले पाहिजे. गेल्या दोन वर्षांतील इस्पितळांतील आग लागण्याच्या दुर्घटना पाहता त्यांचे सुरक्षा ऑडिटही काळजीपूर्वक केले पाहिजे आदी बाबींकडे मोदींनी नेमकेपणाने लक्ष वेधले. पंतप्रधानांसोबतच्या या बैठकीनंतर राज्यातील आघाडी सरकार त्या दिशेने काय हालचाल करते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, पण गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर, आम्ही संख्येकडे लक्ष ठेवून आहोत, तूर्तास तरी मास्कसक्तीचा निर्णय नाही एवढेच काय ते राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. सध्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून बुधवारी मुंबईत 112 नव्या रुग्णांची नोंद झाली. यापैकी एकाच रुग्णाला इस्पितळात दाखल करावे लागले असले तरी राज्यभरातील दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये 60 टक्के रुग्ण मुंबईतील आहेत हे लक्षात घ्यायला हवे. फेब्रुवारीनंतर प्रथमच मुंबईतील रुग्णसंख्या इतकी वाढली आहे. एकीकडे देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना तिसर्या बूस्टर लसीचा डोस घेण्याला मिळत असलेला अत्यल्प प्रतिसाद चिंतेत भर घालतो आहे. हा तिसरा डोस घेतल्याशिवाय आपल्याला ओमायक्रॉन आणि त्याच्या बदलत्या विषाणू उपप्रकारांपासून संरक्षण मिळणार नाही असे तज्ज्ञ आवर्जून नमूद करीत आहेत. तिसरा डोस न घेतलेल्या लोकांकडून इतरांना धोका संभवत असल्याचेे जगभरात अनेक अभ्यासांतून पुढे आले आहे. चीनमध्ये सध्या पुन्हा एकवार कोरोना महामारीची लाट आली असून तेथे राजधानी बीजिंगमध्ये लॉकडाऊनसदृश परिस्थिती ओढवली आहे. जगभरातील अनेक देशांनी चाचण्या आणि जेनोम सिक्वेन्सिंग थांबवल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडे या संदर्भात आता तुलनेने फारच कमी माहिती जमा होते आहे. कोरोना विषाणू आता कसा फैलावतो आहे त्याकडे जगाने अशा तर्हेने डोळेझाक करणे धोक्याचे असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. महाराष्ट्रात मागील लाटांमध्ये देशातील अन्य राज्यांपेक्षा परिस्थिती बरीच हाताबाहेर गेली होती. तेव्हा आघाडी सरकार आतातरी वेळीच सुयोग्य उपाययोजना करेल, अशी आशा बाळगण्याखेरीज व स्वत:च जबाबदारीने सर्व प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याखेरीज जनतेच्या हातात काहीच नाही.
RamPrahar – The Panvel Daily Paper