कर्जत ़: बातमीदार
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून पतीने पत्नीला ठार मारण्याची घटना कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे रविवारी (दि. 5) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पतीने जंगलात पळ काढला असून, नेरळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ताडवाडी येथील लक्ष्मण दरवडा यांच्या बहिणीचे कळंब जवळील फोंडेवाडी येथील योगेश भला याच्या बरोबर आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र योगेश भला हा कोणतेही काम करीत नसल्याने नवरा-बायको यांच्यात सतत भांडणे होत होती. परिणामी भीमा योगेश भला या आपल्या दोन्ही मुलांना घेऊन आपल्या भावाकडे माहेरी ताडवाडी येथे राहत होत्या. दिवसभर केवळ दारू पिणे हा कामधंदा असलेला योगेश भला हा बायको माहेरी गेली म्हणून चार महिन्यापासून ताडवाडी येथे सासरी येऊन राहत होता. भीमा या मोलमजुरी करून आपले घर चालवायच्या, तर पती योगेश हा दारू पिण्यासाठी पैसे द्यावेत म्हणून पत्नी भीमा यांना मारहाण करायचा. रविवारी ताडवाडी येथील घरी भीमा या एकट्याच असताना योगेशने त्यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. भीमा यांच्याकडे नवर्याला द्यायला पैसे नव्हते. त्यामुळे योगेश याने पत्नी भीमा यांच्या डोक्यात धारदार कोयत्याला एक वार करून बोरगावच्या जंगलात पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भीमा यांचा काही वेळाने त्याच ठिकाणी झोपडीत मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त समजताच नेरळ पोलीस तेथे पोहचले असून त्यांनी पंचनामा पूर्ण केला आहे. त्यांनी भीमा भला यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठविला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन सांगळे करीत आहेत. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, सहाय्यक निरीक्षक सोमनाथ जाधव आणि उपनिरीक्षक रतीलाल तडवी यांनी घटनास्थळी जाऊन खून करून जंगलात पळून गेलेल्या योगेशचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार केली आहेत.