पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमध्ये प्रसिद्ध असलेल्या सुखम हॉस्पिटलला दहा वर्षे पूर्ण झाली असून हॉस्पिटलने 11व्या वर्षात प्रवेश केला आहे. त्यानिमित्त पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात दशकपुर्ती सोहळा शुक्रवारी (दि. 6) आयोजित करण्यात आला होता. या निमित्त विविध सांस्कृतीक, कार्यक्रम तसेच कोरोना योद्धांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी भेट देत सुखम हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.
पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या सुखम हॉस्पिटलच्या दशकपुर्ती सोहळ्यामध्ये डॉ. संतोष सुदाम जाधव लिखीत ‘झुंज सुखम ची कोरोनाशी’ या अनुभवांच्या गाथेचे, सुखम पोर्टलचे आणि बीएमडी अॅपचे उपस्थित मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन व लोकार्पण झाले. या सोहळ्यानिमित्त साज या सुरेल गाण्यांचे सादरी करण झाले तसेच कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता सेवाकार्य करणार्यांचा कोरोना योद्धा म्हणून मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
या सोहळ्याला महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा बालशल्य चिकित्सक अध्यक्ष डॉ. संजय ओक, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी.देशमुख, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अजय बहिरा, नगरसेविका सुशीला घरत, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, सुखम हॉस्पिटलचे डॉ. संतोष जाधव, डॉ. दिपाली जाधव, डॉ. प्रमोद गांधी, डॉ. उदय शेळक यांच्यासह पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.