पाच दुचाकी जप्त करण्यात गुन्हे शाखेला यश
पनवेल ः वार्ताहर
ओएलएक्सच्या माध्यमातून महागडी दुचाकी वाहने विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ग्राहकांची फसवणूक करणार्या आंतरराज्यीय टोळीतील त्रिकुटाला गुन्हे शाखा युनिट-2च्या पथकाने अटक केली आहे. या त्रिकुटाने अशाच पद्धतीने फसवणूक करुन मिळविलेली पाच लाख 50 हजार रुपये किंमतीची पाच दुचाकी गुन्हे शाखेने हस्तगत केली आहेत. या त्रिकुटाकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी व्यक्त केली आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेल्यामध्ये अब्दुल कलाम शफिकुल रहमान मुजुमदार (29), अब्दुल अजिज फैजुर रहमान लष्कर (26) व हुज्जतहुल हुसेन नुरुल इस्लाम चौधरी (26) या तिघांचा समावेश असून हे तिघेही आसाम राज्यातील आहेत. गत महिन्यामध्ये खांदेश्वर व नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्या काही जणांनी त्यांच्या वापरात नसलेल्या बजाज कंपनीच्या केटीएम मोटारसायकल विक्री करण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात दिली होती. या जाहिराती पाहून या त्रिकुटाने त्यांच्या मोटारसायकल मोठ्या रक्कमेला विकत घेण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर त्यांनी दुचाकी मालकांचा विश्वास संपादन करुन त्यांच्या दुचाकीवरुन राउंड मारुन येण्याच्या बहाणा करुन पलायन केले होते. याबाबत खांदेश्वर व नेरुळ पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुह्यांचा तपास करण्यात येत होता. पथकाने दोन्ही गुन्हयांच्या घटनास्थळी भेट देऊन तसेच सीसीटिव्ही फुटेज तांत्रिक तपासाव्दारे माहिती काढली असता, दोन्ही गुन्हे हे एकाच टोळीने केल्याचे आढळून आले. त्यानंतर पथकाने तांत्रिक तपासाव्दारे तिन्ही आरोपींची माहिती मिळवून त्यांना अटक केली. अधिक चौकशी केली असता, त्यांनीच खांदेश्वर आणि नेरुळ येथील गुन्हे केल्याची कबुली दिली.
चोरीच्या दुचाकीवर त्यांच्याजवळ असलेल्या जुन्या दुचाकीच्या नंबरप्लेट लावून त्या एलटीटी रेल्वे स्थानकातून पार्सलने आसाम येथील कामाख्या येथे विक्रीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती दिली. त्यांनी अशाप्रकारे आणखीन तीन दुचाकी आसाम येथे पाठविल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखने तात्काळ रेल्वेस्थानक पार्सल विभागाशी संपर्क साधुन या गुन्हयातील पाच दुचाकी ताब्यात घेतल्या. इतर वाहनांबाबत तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली.
गुन्हा करण्याची पद्धत
या गुन्हयात अटक करण्यात आलेले तीनही आरोपी हे मूळचे आसाम येथील रहिवाशी असून ते गुन्हा करण्यासाठी नवीन सीमकार्ड व मोबाईल घेत होते. ओएलएक्सवर महागड्या मोटारसायकल विकण्याची जाहिरात देणार्या व्यक्तींना संपर्क साधून त्यांची मोटारसायकल मोठया रक्कमेला विकत घेण्याचे आमिष दाखवत होते. दुचाकी राऊंड मारण्याच्या बहाण्याने घेऊन सदर मोटारसायकल घेऊन पळून जात. त्यानंतर चोरीच्या दुचाकीवर स्वत:च्या अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या मोटारसायकलची नंबर फ्लेट लावून त्या मोटारसायकलच्या आरसीबुकच्या मदतीने रेल्वेने सदरच्या मोटारसायकल आसाम राज्यात पाठवुन त्याठिकाणी त्यांची विक्री करत होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper