Breaking News

घोणसे घाटात बस कोसळली

तिघांचा जागीच मृत्यू, 35 जण जखमी, रुग्णालयात दाखल

म्हसळा ः प्रतिनिधी

म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात एका खासगी बसला रविवारी (दि. 8) सकाळी भीषण अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर 35 जण जखमी झाले आहेत. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त प्रवासी मूळचे श्रीवर्धन तालुक्यातील आहेत. ठाण्यातील विरार-नालासोपारा येथून मूळचे श्रीवर्धन तालुक्याच्या काही गावांमधील रहिवासी असलेले लोक प्राजक्ता ट्रॅव्हल्सच्या बसमधून (एमएच 04-एफके 6614) आपल्या गावाकडे येत होते. ही बस सकाळी 7.40च्या सुमारास म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात आली असता एका तीव्र वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून ती सुमारे 70 फूट खोल कोसळली. या भीषण अपघातात अश्विनी शैलेश बिरवाडकर (वय 35), मधुकर बिरवाडकर (वय 60, दोघेही रा. धनगरमलई) आणि सुशांत रिकामे (वय 28, रा. वडघर पांगळोली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन चालकांसह 35 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 15 जण गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी माणगाव, अलिबाग आणि महाड येथे हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये बसचालक स्वप्नील साळुंखे (सातारा), दुसरा चालक देवेंद्र भाईप (विरार), पार्थ बिरवाडकर, दीप बिरवाडकर, दिव्या बिरवाडकर, प्रतिभा बिरवाडकर, पंकज बिरवाडकर, तुकाराम साबळे, सरस्वती साबळे, श्रेयस बिरवाडकर (रा. धनगरमलई), सदानंद सोलकर, शैलेश सोलकर, विशाखा निमरे, विपुल निमरे (रा. देवखोल), नेहा थळे, सुप्रिया रिकामे, सुधीर रिकामे, श्रुती खळे, श्रेया खळे, वैदही खळे (सर्व रा. नागलोली), अभय पाडावे, भालचंद्र पाडावे, प्रेरणा पाडावे, वैष्णवी पाडावे, विजय पाडावे, वेदांत पाडावे, वीर पाडावे, तेजस बिरवाडकर, निधी पाडावे (सर्व रा. बोर्ली), शांताराम पवार, श्रावणी नटे, शास्वती खळे, निहाल खळे, मंदा पवार, वेदांत पाडवे, (सर्व रा. खुजारे) यांचा समावेश आहे. अपघात होण्यापूर्वी बस घोणसे घाटात येताना दुसर्‍या तीव्र उतार वळणावर एका चालकाने गाडीचा ताबा सोडून दुसर्‍या चालकाला गाडी चालविण्यासाठी दिली होती. त्यानंतर काही क्षणांतच बस शेवटच्या तीव्र उतारावर कोसळली, असे बसमधील किरकोळ जखमी झालेले प्रवासी सदानंद सोलकर (रा. देवखोल) यांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघाताची म्हसळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला तेथे गेल्या दोन वर्षांत तीन ते चार अवजड वाहनांचा अपघात झाला होता, मात्र जीवित हानी झाली नव्हती. बर्‍याच अवधीनंतर घोणसे घाट अपघातात एकाच वेळी तीन जण दगावण्याची घटना घडली आहे.

Check Also

शिवसेनेच्या सोनल घरत यांचा अर्ज मागे

भाजप महायुतीच्या उमेदवार जिज्ञासा किशोर कोळी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत …

Leave a Reply