उरण ः बातमीदार
उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यावर रविवारी (दि. 15) शिवराज युवा प्रतिष्ठानच्या वतीने साफसफाई मोहीम सुरू असताना हौदात एका मृत व्यक्तीच्या शरीराचे अवयव आढळले. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर त्यांनी येऊन पाहणी केली आणि हे अवयव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. शिवराज युवा प्रतिष्ठानच्या वतीने दर रविवारी द्रोणागिरी किल्ल्यावर साफसफाई मोहिमेचे आयोजन करण्यात येते. मोहिमेच्या माध्यमातून किल्ल्यावरील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जाते. अशाच प्रकारे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पदाधिकारी व सदस्यांनी किल्ल्यावर साफसफाई मोहिमेचे आयोजन केले होते. या वेळी किल्ल्याजवळ असलेल्या पाण्याचा हौदाठिकाणी सफाई करताना या हौदात एका मृत व्यक्तीच्या डोक्याची कवटी, हाडे आढळली. ही माहिती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी उरण पोलीस ठाण्याला कळविली. त्यानुसार पोलीस पथक किल्ल्यावर दाखल झाले. त्यांनी मृत व्यक्तीचे अवशेष प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. संबंधित मृत व्यक्ती कोण आहे? तिचा मृत्यू कधी झाला? किल्ल्यावर हौदात ती कशी पडली? आदी गोष्टींचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper