Breaking News

विमानतळाला ‘दिबां’चेच नाव लागणार! 

सिडको घेराव आंदोलनाची नवी मुंबईतही जोरदार तयारी

नवी मुंबई ः प्रतिनिधी

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती आयोजित 29 गाव संवाद बैठकीच्या पार्श्वभूमीवर कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिर सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक यांनी नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव द्यावेच लागेल, असे ठणकावून सांगत येत्या 24 जून रोजी पुनःश्च एकदा विमानतळ नामकरणासह प्रलंबित मागण्यांसाठी भूमिपुत्र, शहरवासीय आणि झोपडपट्टीधारक एकत्रितरीत्या राज्य शासनाच्या विरोधात शांततेच्या मार्गाने सिडको घेराव आंदोलन करणार असल्याचे सांगितले.  मुख्य कृती समिती अंतर्गत नवी मुंबई महापालिका समन्वय समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत व्यासपीठावर सहचिटणीस संतोष केणे, सदस्य दशरथ भगत, डॉ. राजेश पाटील, मनोहर पाटील, दीपक पाटील, नवी मुंबई क्षेत्र समन्वयक शैलेश घाग, सुनील पाटील, शिवचंद्र पाटील, सुरेश वास्कर, प्रकाश पाटील, साईनाथ पाटील, शशांक कट्टे आदी उपस्थित होते. लोकनेते दि. बा. पाटील नामकरण आंदोलन हा महाविकास आघाडीने ओढवून घेतलेला प्रश्न आहे. ‘दिबां’च्या सर्वपक्षीय शोकसभेत नामकरण ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला होता. मग त्यांच्या नामकरण प्रस्तावावर निर्णय घेण्यास मुख्यमंत्री विलंब का लावत आहे, असा सवाल या वेळी संजीव नाईक यांनी उपस्थित केला.  दशरथ भगत यांनी सांगितले की, 24 जूनचे सिडको घेराव आंदोलन हे पुनश्च एकदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्य सरकारला इशारा देणारे असणार आहे. या आंदोलनात आगरी, सागरी व शहरातील भूमिपुत्र आपली एकजूट दाखवणार आहेत. नामकरण आंदोलन हे देशातील स्वामित्वाच्या हक्काचा केंद्रबिंदू ठरले आहे. आम्ही गांधी मार्गाचा अवलंब करून शांततेत आंदोलन करू, मात्र आंदोलनाचे रूपांतर उद्रेकात करायचे काय हे शासनाने ठरवावे. डॉ. राजेश पाटील म्हणाले की, नवी मुंबईतील स्थानिक कष्टकरी, शेतकरी यांच्या अस्मितेसाठी शासनाने ‘दिबां’ची कर्मभूमी असलेल्या भूमीवर साकारत असलेल्या विमानतळाला त्यांचे नाव द्यावे, अशी आग्रही मागणी स्थानिक भूमिपुत्र सातत्याने करीत आहेत. नामकरण तसेच भूमिपुत्रांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांतील भूमिपुत्र एकसंघ होऊन आपली शक्ती शासनास दाखविणार आहेत.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply