रोहे : प्रतिनिधी
मजूरांची टंचाई पहाता यापुढे रोहा तालुक्यात यांत्रिक पध्दतीने भात लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या वतीने रोहा तालुक्यात ठिकठिकाणी यांत्रिक पध्दतीने भातलागवड प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतीतील कामे अत्यंत सुलभ व्हावी, या दृष्टीने अनेक अवजारे शेतीच्या कामात उपयुक्त व्होवू लागली आहेत.नांगरणी, फवरणीसह अन्य कामे यांत्रिकी पध्दतीने होत असताना आता भातलागवडसुध्दा यांत्रिकी पध्दतीने होणार आहे. रोहा तालुक्यातील यशवंतखार येथील भैरवनाथ शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून रोहा तालुक्यातील तळाघर, यशवंतखार, भातसई, मेढा धामणसई येथे यंत्राच्या सहाय्याने भातलागवड प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार असून त्याचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी केले आहे. मशीन हताळणीचे प्रशिक्षण प्रयोगशील शेतकरी अनिल पाटील यांच्या शेतावर देण्यात येणार आहे. यांत्रिक पद्धतीचा अवलंब केल्यास या यंत्राच्या सहाय्याने भातलागवड केल्याने मजूर उपलब्ध नसलेल्या भागात भातलागवडीसाठी लाभ होणार आहे. एका रेषेत भात लागवड होणार असून हवा पाणी खेळते राहाणारे आहे. किडरोग नियंत्रणात राहाणारे आहे. गवत काडी, कचरा गोळा करणे सोपे जाणार आहे.उत्पादनात वाढ होणार असून हेक्टरी 55 ते 60 क्विंटल उत्पादन वाढ अपेक्षित आहे. यांत्रिकी (मशीन)ची किंमत अडीच लाख असून यावर शासनाकडून सव्वा लाखाची सबसिडी मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे सुशील कोळेकर यांच्या पुढाकाराने एक्सेल कंपनीचे विवेकानंद रिसर्च सेंटर रोहा च्या वतीने ही आर्थिक मदत मशीन खरेदीसाठी मिळणार आहे.