Breaking News

…अन्यथा बेमुदत बंद करू

कामगार नेते सुधीर घरत यांचा जेएनपीए प्रशासनाला इशारा

उरण : प्रतिनिधी, बातमीदार

भारतीय मजदूर संघटनेचा 68 वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने जेएनपीएच्या कामगार वसाहतीमधील बहुउद्देशीय सभागृहात शनिवारी (दि. 23) कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कामगार नेते सुधीर घरत म्हणाले की, 950 कंत्राटी कामगारांच्या न्यायासाठी 29 जुलै 2022 रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरही जेएनपीए प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत तर कामगारांच्या न्याय हक्कासाठी जेएनपीएविरोधात बेमुदत बंदची हाक द्यावी लागेल.

या कामगार मेळाव्यात भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, जेएनपीटीचे माजी कामगार विश्वस्त रवींद्र पाटील, जनार्दन बंडा यांचीदेखील भाषणे झाली. व्यासपीठावर  संघाचे जिल्हा संघटन मंत्री रंजन कुमार, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर पाटील, लंकेश म्हात्रे, धर्माजी पाटील, प्रमोद पाटील आदी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी भारतीय मजदूर संघटनेचे कोषाध्यक्ष तथा कामगार नेते सुधीर घरत यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना संघटनेचे महत्त्व पटवून दिले. संघटनेच्या यशाचे श्रेय हे कामगारांच्या एकतेमध्येच असल्याचे सांगतानाच त्यांनी महाभारताच्या युध्दाचे उदाहरण दिले.कौरवसेनेत एकापेक्षा एक शुरवीर बलाढ्य महायोध्दे असतानाही प्रत्येकाच्या मिपणामुळे कधीही एकसंघ होऊन लढले नाहीत.त्याउलट संख्येने कमी असतानाही श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली एकसंघ होऊन लढलेल्या पांडवांनी विजय मिळवला. त्यामुळे भारतीय मजदूर संघटनेच्या यशाचे श्रेयही एकतेमध्येच आहे. संघटनेत मी पणाला अजिबात थारा नाही, असे रोखठोक विचार कामगार नेते सुधीर घरत यांनी मांडले.

कंत्राटी कामगारांच्या न्यायासाठी आंदोलन

काही जेएनपीएचे अधिकारी स्वताच्या स्वार्थासाठी कामगारांच्या हिताशी खेळत आहेत. त्यांचे न्याय हक्क डावळत आहेत. त्यामुळेच 950 कंत्राटी कामगारांच्या न्यायासाठी 29 जुलै 2022 रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे, असेही या मेळाव्यात कामगार नेते सुधीर घरत यांनी सांगितले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply