Breaking News

महापालिका शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रगतीचे दार खुले

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरील नियमित परिक्षांप्रमाणेच सध्याच्या स्पर्धेच्या युगात विविध स्पर्धा परिक्षांमध्येही सहभागी होण्याची संधी देऊन लहानपणापासूनच त्यांच्या क्षमतेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते.या अनुषंगाने महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते व त्यादृष्टीने त्यांना अभ्यास साहित्य उपलब्ध करून देऊन त्यांची तयारीही करून घेतली जाते.

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात महानगरपालिकेच्या शाळांतील 139 विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेले आहे. या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी व प्रगतीसाठी उपयोगी ठरतील अशा बाबी प्रोत्साहन म्हणून उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेतून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागामार्फत विविध योजनांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिष्यवृत्ती परिक्षा व आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरमहा 600 रुपये इतक्या रक्कमेची शिष्यवृत्ती पुढील तीन वर्षांकरिता लागू करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व विकसित व्हावे व त्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी पूरक गोष्टी अनुभवता याव्यात यादृष्टीने या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना इस्त्रोसारख्या नामांकित वैज्ञानिक संस्थेची शैक्षणिक सहल घडविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच शैक्षणिक पाठ्यपुस्तकांच्या पलिकडे जाऊन या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी व आजच्या झपाट्याने बदलत्या युगातील अद्ययावत माहिती व ज्ञान त्यांच्याकडे असावे या दृष्टीने शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची वैज्ञानिक मासिकाची वर्गणी तीन वर्षांकरिता भरण्यात येणार आहे.

याशिवाय सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगात इंटरनेटव्दारे सारे जग आपल्या हातातील मोबाइलमध्ये अवतरलेले असताना या शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रयोजनार्थ मोबाईल प उपलब्ध करुन देण्यासाठी 10 हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य देणेबाबत अभिनव योजना सुरू करण्यात येत आहे.

नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत सन 2022-23 पासून शिष्यवृत्ती परीक्षा व आर्थिक दुर्बल घटकांसाठीची राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या उल्लेखनीय योजना लागू करण्यासाठी महापालिका आयुक्त बांगर यांची मान्यता लाभलेली असून याद्वारे महानगरपालिका शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रगतीचे दार खुले झाले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply