कोरोनाचे समूळ उच्चाटन झालेले नसताना मंकीपॉक्सने शिरकावकेला. त्यानंतर आता साथरोगांनी धुमाकूळ घातला आहे. डेंग्यू, हिवताप, स्वाईन फ्ल्यूचे अनेक रुग्ण सर्रास आढळून येत आहेत. वाढती गर्दी या संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
पावसाळा आणि संसर्गजन्य आजार हे समीकरण ठरलेलेच. कडक उन्हाळ्यानंतर सुरू होणार्या पावसाळ्यात तापमान खाली येते. कधी कधी तर अतिवृष्टीमुळे वातावरणात प्रचंड गारवा येतो. त्यामुळे मुले, वृद्ध हमखास आजारी पडतात. त्याचप्रमाणे दूषित पाणी, डासांची उत्पत्ती विविध आजारांना कारणीभूत ठरते. यंदा जूनमध्ये ओढ देणारा वरुणराजा नंतर जुलै, ऑगस्टमध्ये धो धो बरसला. त्यामुळे अनेक भागांत पूर आले आणि जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी वित्त हानीबरोबरच जीवित हानीदेखील झाली. मोठ्या प्रमाणात आणि सातत्याने पडलेल्या पावसामुळे राज्यातील बहुतांश धरणे भरली असून उर्वरित भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सर्वसाधारणपणे जून, जुलैमध्ये दमदार पडल्यानंतर ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण कमी होत जात असते, पण या वर्षी अजूनही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय. बदलते हवामान आजार पसरण्यासाठी अनुकूल ठरत आहे. सध्या मुंबई, ठाण्यासह अन्य शहरी भागांमध्ये डेंग्यूसोबतच हिवताप, स्वाईन फ्ल्यूचा फैलाव झाला आहे. याशिवाय लेप्टो, काविळ, चिकूनगुनिया, गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्याच्या ग्रामीण भागांतही सर्दी, पडसे, तापाचे रुग्ण आहेत. वाढत्या रुग्णांमुळे शासकीय तसेच खासगी रुग्णालये भरू लागली आहेत. गेली दोन वर्षे सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळत होते. आता मात्र अन्य रुग्णांचा भरणा अधिक आहे. सध्या सणासुदीमुळे बाजारपेठा गजबजल्या असून लोक मोठ्या संख्येने लोक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. साथरोगांना त्यामधून निमंत्रण मिळत आहे. गर्दीमध्ये आजारांचा संसर्ग पसरण्यास जास्त वेळ लागत नाही. कोरोना काळात अनेक निर्बंध तसेच लोकांमध्ये भीतीयुक्त वातावरण असल्याने तेव्हा लोक तेवढी गर्दी करीत नव्हते जेवढी आता दिसून येते. मुख्य म्हणजे आरोग्यविषयक काळजी घेतली जात होती. त्यामुळेच तेव्हा इतर आजारांचे नामोनिशाण नव्हते, पण कोरोच्या लाटा सरल्यानंतर अन्य आजार पुन्हा डोके वर काढू लागल्याचे चित्र दिसत आहे. आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव पुढे दिवाळी असे सण-उत्सवांची मालिका असणार आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणे आवश्यक आहे. खासकरून सार्वजनिक ठिकाणी वावरताना सतर्क राहणे गरजेेचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता पाळणे, पाणी उकळून व गाळून पिणे, खोकताना-शिंकताना रूमाल वा फडके समोर धरणे, एखाद्या आजाराची लक्षणे दिसल्यास डॉक्टरकडे जाणे यांसारख्या छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केले तरी खूप होईल. सणवारांमुळे बाजारपेठा, गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. त्या ठिकाणी अधिक धोका आहे. तेथे सर्वांनीच विशेष खबरदारी घेतली पाहिजे. एखाद्या आजाराची लक्षणे असल्यास घराबाहेर न पडणे उचित ठरेल. शासन, प्रशासन आपल्या पातळीवर आरोग्य यंत्रंणांना सर्तक करून उपाययोजना राबवित आहेच, पण प्रत्येकाने स्वत:सह कुटुंबाचा आणि समाजाचा विचार करून पावले टाकायला हवीत. नाही तर थोडीशी बेफिकीरी भारी पडू शकते. त्यामुळे जरा जपूनच पावले टाकूया!
Check Also
राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ
स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …
RamPrahar – The Panvel Daily Paper