मुंबई-गोवा महामार्गावर बंदोबस्तात वाढ
अलिबाग ः प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्नपणे व्हावा यासाठी रायगड पोलीस सज्ज सज्ज झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. महामार्गावर आठ ठिकाणी अठरा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून प्रवाशांच्या मदतीसाठी 10 मदत केंद्रही स्थापन करण्यात येणार आहेत.
बंदोबस्तासाठी सात उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व 225 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीला गृहरक्षक दल, राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, महामार्ग पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. पोलिसांना एकमेकांसोबत तसेच नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधण्यासाठी बिनतारी संच व वॉकी टॉकी देण्यात येणार आहेत.
महामार्गावर रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात आठ ठिकाणी 18 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेर्यांच्या माध्यमातून महामार्गावरील वाहतुकीवर रायगडचे पोलीस अधीक्षक, विभागीय पोलीस अधीक्षक तसेच ठिकठिकाणच्या पोलीस नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येणार आहे.
महामार्गावर हमरापूर फाटा, पेण-खोपोली बायपास, रामवाडी चौकी, माणगाव तालुक्यातील इंदापूर स्टॅण्ड, महाड तालुक्यात महाड शहर, नातेखिंड, विसावा हॉटेल, पाली जोडरस्ता या ठिकाणी एकूण 18 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
खारपाडा, पेण, वडखळ, वाकण, कोलाड, माणगाव, लोणेरे, नातेखिंड, पोलादपूर आणि पाली येथे ही प्रवासी मदत केंद्र उभारण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी असलेल्या पोलीस चौक्यांवर प्रवाशांसाठी मदत उपलब्ध असणार आहे. बिनतारी संदेशवहन यंत्रणा, रुग्णवाहिका आणि क्रेन सुविधा या सर्व केंद्रांवर तैनात असणार आहे.
माणगाव, नागोठणे, रामवाडी या बसस्थानकांमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. बसस्थानकात येणार्या-जाणार्या गाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी या स्थानकांना पर्यायी स्थानके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या मूळ स्थानकापासून 100 मीटर परिसरात मोकळी जागा शोधून तात्पुरती पर्यायी स्थानके उभारण्यात येणार आहेत.
महामार्गावर प्रवाशांच्या मदतीसाठी 10 मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या मदत केंद्रांमध्ये महामार्गावर एखादा अपघात किंवा गाडी बंद झाल्यास ती महामार्गावरून हटविण्यासाठी क्रेन, जेसीबी ठेवण्यात येतील तसेच अपघातात कोणी जखमी झाल्यास त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकादेखील ठेवण्यात येणार आहेत. या रुग्णवाहिकांमध्ये डॉक्टर, परिचारिका असणार आहेत.
मुंबई, पुणे, बोरीवली, ठाणे, कल्याण येथील चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. खड्ड्यांमुळे तसेच अन्य काही कारणांमुळे एसटी बसमध्ये बिघाड झाल्यास तातडीने सेवा देण्यासाठी पोलादपूर, सुकेळी, वाकण, माणगाव, रामवाडी, वडखळ या ठिकाणी दुरुस्ती व गस्त पथक तैनात केले जाणार आहे. ठिकठिकाणी ब्रेकडाऊन वाहनाचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी मॅकेनिक व अन्य कर्मचारी असे एकूण 20पेक्षा अधिक कर्मचारी असणार आहेत.
आरोग्य यंत्रणाही सुविधांसह सज्ज
गणेशोत्सव काळात मुंबईहून कोकणामध्ये राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होते. या वेळी अपघात होऊन जीवितहानी तसेच प्रवासी जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी अपघातग्रस्त रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हमरापूर, वडखळ, वाकण फाटा, कोलाड नाका, इंदापूर, दासगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक पुरेशा औषधसाठा व रुग्णवाहिकेसह सुसज्ज ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली.
गणेशोत्सव कालावधीत खारपाडा ब्रीज ते कशेडी घाटदरम्यान बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी व अंमलदार सर्व सूचनांसह सज्ज करण्यात आले आहेत. रायगड जिल्हा पोलीस दल सर्व गणेशभक्तांचा प्रवास हा विनासायास व सुखकर व्हावा याकरिता 24 तास कार्यरत राहील. -अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक रायगड
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अथवा अडचणीमध्ये मदतीसाठी पोलीस नियंत्रण कक्ष येथे संपर्क करावा. गणेशभक्तांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाईल. वाहनचालकांनी लेनची शिस्त पाळावी, जेणेकरून वाहतुकीचे नियमन करणे सोपे जाईल. -अशोक दुधे, पोलीस अधीक्षक रायगड