मुंबई : प्रतिनिधी
नाणार प्रकल्पाबाबतच्या भूमिकेवर आम्ही ठाम असून हा प्रकल्प होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. तसेच जमीन अधिग्रहणासोबतच शेतकर्यांच्या जमिनींचा प्रलंबित मोबदला देण्यात यावा असे आदेशही त्यांनी या वेळी संबधित अधिकार्यांना दिले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण सध्या रत्नागिरी दौर्यावर आहेत. या दौर्यादरम्यान त्यांनी राजापुरातील नाणार रिफायनरी संदर्भात अधिकार्यांची बैठक घेतली. या वेळी बोलताना मंत्री चव्हाण पुढे म्हणाले, नाणार प्रकल्प नक्की होणारच आहे. याबाबत आम्ही ठाम असल्याचे सांगितले. दरम्यान, शिवसेना नेते राजन साळवींसोबत झालेल्या बैठकीवर चव्हाण यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना कोकणातील समस्यांसदर्भात चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तसेच आम्ही विकासाला महत्व देत असल्याचेही ते म्हणाले.
या दौर्यात मंत्री चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. दरम्यान, शिवसेना आमदार राजन साळवी हे शिंदे गटात जाण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. मरेपर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहील असं काही दिवसांपूर्वी साळवी यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा साळवी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper