Breaking News

कुंडलिका नदी परिसराने घेतला मोकळा श्वास

रोह्याच्या नदी संवर्धन क्षेत्रातील बेकायदेशीर गाळे हटवले

धाटाव : प्रतिनिधी

नगर परिषदेने कारवाईचा बडगा उगारताच कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाच्या जागेतील अनधिकृत गाळे संबंधीतांनी हटवून जागा मोकळी करून दिली. त्यामुळे रोहा शहरातील कुंडलिका नदी परिसराने पुन्हा मोकळा श्वास घेतला.

रोहा शहरातील कुंडलिका नदीच्या काठावर 32 कोटी रुपये खर्चून नदी संवर्धन प्रकल्प उभा राहिला आहे. हा प्रकल्प विविध कारणांनी कायम चर्चेत आहे. या प्रकल्पाशेजारी अनेक हातगाड्या लावून परिसर अस्वच्छ ठेवण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. अनधिकृत भाजी विक्री शेड टाकणे, गाळे  बांधणे असे प्रकारही सुरू आहेत. या नदी संवर्धन प्रकल्पाच्या जागेत बेकायदेशीरपणे पत्र्यांचे गाळे उभारून परस्पर विकण्याचा घाट काही लोकांनी घातला होता. त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. भाजपचे तालुका उपाध्यक्ष शैलेश रावकर, शिवसेनेचे समीर शेडगे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत देशमुख, महंमदशेठ डबीर यांनी तसेच रोहा सिटीझन फोरमने नदी संवर्धन प्रकल्पाच्या जागेतील बेकायदेशीर पत्र्यांच्या गाळ्यांचा विषय लावून धरला. त्यानंतर नगर परिषदेचे प्रशासक डॉ. धीरज चव्हाण यांनी, ‘गाळे हटवून, जागा मोकळी करुन द्यावी, अन्यथा  जप्तीची कारवाई करण्यात येईल‘, अशा सूचना संबंधितांना दिल्या होत्या. त्याची नोंद घेत संबंधितांनी नदी संवर्धन प्रकल्पाच्या जागेतील बेकायदेशीर गाळे हटवून अतिक्रमण केलेली जागा मोकळी करून दिली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply