लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन
पनवेल : रामप्रहर वृत्त
मुंबई विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष 2021-2022मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठस्तरीय 16व्या आविष्कार संशोधन महोत्सवात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर महाविद्यालयास (स्वायत्त) शिक्षक दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि. 5) ओव्हरऑल रनर चॅम्पियनशीप ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील व आविष्कार संशोधन समितीच्या अध्यक्ष डॉ. सीमा कोकितकर यांनी ही ट्रॉफी स्वीकारली.
प्रस्तुत संशोधन स्पर्धेत सीकेटी महाविद्यालयाने दोन सुवर्ण, एक कांस्य याबरोबर उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. रसायनशास्त्र विभागाचे संशोधन विद्यार्थी अमोल पिंजरकर यांना प्रो. डॉ. बी. व्ही. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जैवतंत्रज्ञान विभागाच्या संशोधन विद्यार्थिनी राजगुरू बिंदू यांना डॉ. सीमा कोकितकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णपदक जिंकले. अर्थशास्त्र विभागाचे पदव्युत्तर पदवी भाग-2चे सुमित जोशीने प्रो. डॉ. बी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कांस्यपदक मिळविले, तर जैवतंत्रज्ञान विभागाच्या संशोधन विद्यार्थिनी रूपाली नानेकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आविष्कार संशोधन समितीच्या अध्यक्षा डॉ. सीमा कोकीतकर, समितीचे सर्व सदस्य व संशोधन मार्गदर्शक यांनी स्पर्धेतील घवघवीत यशासाठी विशेष परिश्रम घेतले.
या स्पृहणीय यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आविष्कार संशोधन समितीचे कौतुक केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper