रोहे : प्रतिनिधी
दहा दिवसांच्या गणपती विसर्जननंतर रोहा तालुक्यात पावसाने सुरुवात केली आहे. सुरूवातील रिमझीम असलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून जोरदार कोसळण्यास सुरुवात केली. मंगळवारीही पावसाचा जोर कायम होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत रोह्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस पडत आहे. दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, साखरचौथ गणेशोत्सव सुरू असताना पावसाची हजेरी लागल्याने भाविकांना घराबाहेर पडता येत नव्हते. मंगळवारी दिवसभर पाऊसमय वातावरण होते. सकाळी शाळेत जाताना मुलांची व कामावर जाणार्या कामगारांची तारंबळ उडाली होती. मंगळवारी दुपारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी रिमझीम पाऊस पडतच होता. मध्येच मोठी सर येवून जात होती. सायंकाळी पुन्हा पावसाने जोर धरल्याने बाजारात शुकशूकाट होता.