Breaking News

बारा हत्तींचे बळ

खासदार संजय राऊत यांना झालेली अटक ही एका भ्रष्टाचार प्रकरणातील होती, अन्य कुठल्या राजकीय आरोपाखाली त्यांना अटक झाली नव्हती याचे विस्मरण सामान्य नागरिकांनी होऊ देऊ नये, परंतु समाजातील संवेदना आताशा बोथट झाल्या आहेत की, काय अशी शंका येते. भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात जाणारा आरोपी हा काही क्रांतिकारक नसतो याचे भान अनेकदा सुटताना दिसते. गेले तब्बल शंभरहून अधिक दिवस तुरूंगवास भोगून झाल्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची सत्र न्यायालयाने बुधवारी जामिनावर सुटका केली. 102 दिवसांनंतर खासदार राऊत आर्थर रोड कारागृहातून बाहेर आले, तोवर संध्याकाळ होऊन गेली होती. त्यांना आता शिवसेनेचे माजी प्रवक्ते असे संबोधन लावावे लागेल कारण गेल्या शंभर दिवसांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. खासदार राऊत ज्या शिवसेनेचे प्रवक्ते होते, ती शिवसेनाच आता उरलेली नाही. या पक्षात उभी फूट पडून त्याची दोन शकले झाली आहेत. त्यातील एक भाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर विराजमान आहे, तर दुसरा भाग ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नावानिशी आपले अस्तित्व टिकवण्याची धडपड करतो आहे. ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे त्या पक्षाचे तात्पुरते नाव आहे. अंधेरी पूर्व येथे नुकत्याच होऊन गेलेल्या निवडणुकीच्या संदर्भात जे कोर्टकज्जे झाले, त्यामधून उद्भवलेल्या वादात ठाकरे गटाला हे नवे नाव मिळाले तसेच ‘मशाल’ हे नवे निवडणूक चिन्ह देखील प्राप्त झाले. ज्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासाठी खासदार राऊत हिरीरीने संघर्ष करीत होते, ते चिन्ह आता गोठवण्यात आले आहे. म्हणून त्यांना शिवसेनेचे माजी प्रवक्ते असे म्हणणे भाग पडेल. खासदार राऊत यांची पत्राचाळ प्रकरणी झालेली अटक शंभर दिवसांपूर्वी गाजली होती. त्यांची अटक जशी गाजली, तशीच त्यांची सुटका देखील जल्लोषात साजरी करण्यात आली. बहुतेक सर्व टीव्ही वाहिन्या त्यांच्या सुटका-नाट्याचे थेट प्रक्षेपण करण्यात मश्गुल झाल्या होत्या. सत्र न्यायालयाने दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर खासदार राऊत यांची जामिनावर सुटका केली. या निकालाला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) उच्च न्यायालयात आव्हान दिले, परंतु राऊत यांच्या जामिनास तातडीने स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. खासदार संजय राऊत तीन महिन्यांहून अधिक काळ राजकीय चर्चेतून काहिसे बाहेर फेकले गेले होते. मधल्या काळात ठाकरे गटाच्या प्रवक्तेपणाची जबाबदारी श्रीमती सुषमाताई अंधारे, विनायक राऊत, सुभाष देसाई, अनिल परब आदी नेत्यांनी यथाशक्ती सांभाळली. तरीही खासदार राऊत यांची गैरहजेरी सर्वांना जाणवत होतीच. त्यांच्या पुनरागमनामुळे ठाकरे गटाला बारा हत्तींचे बळ मिळेल असे म्हणायला हरकत नाही. राजकीय घडामोडींमध्ये प्रचंड नुकसान झालेल्या ठाकरे गटाला मातब्बर, आक्रमक प्रवक्त्याची गरज भासत होती. अनेक ज्येष्ठ नेते पक्षात असूनही आदित्य ठाकरे यांना वारंवार माध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी यावे लागत होते. खुद्द उद्धव ठाकरे यांना देखील मातोश्री सोडून मैदानात उतरावे लागले. खासदार संजय राऊत यांच्या पुनरागमनामुळे ठाकरे गटाचा आवाज बुलंद होईल यात शंका नाही, परंतु त्या बुलंद आवाजाने शिवराळपणाचे प्रदूषण आणखी वाढवू नये एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा असेल.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply