मान्यवरांकडून मार्गदर्शन
कळंबोली : बातमीदार
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास युवकांना शिकवून देशभक्त युवा पिढी घडविण्यास पालकांनी पुढाकार घ्यावा. हिंदू तरुण पिढीला धर्मशिक्षण देण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतल्यावर घरोघरी देशभक्त आणि धर्माविषयी ज्ञानी पिढी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन कळंबोली येथील वर्तक क्लासेसचे संचालक संतोष वर्तक यांनी केले.
कळंबोली येथे नवीन सुधागड शाळा मध्ये हिंदू राष्ट्र जागृती सभा झाली. त्यावेळी उपस्थित हिंदूंना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या सभेला हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी आणि सनातन संस्थेच्या धनश्री केळशीकर यांनी सुद्धा संबोधित केले.
पनवेल येथील बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे कळंबोली शहराध्यक्ष आणि नगरसेवक रविनाथ पाटील, भाजपचे सचिव आणि स्वामी समर्थ मंडळाचे प्रतिनिधी संतोष गायकवाड, श्रीराम मंदिर ट्रस्ट आणि बजरंग दलाचे पनवेल प्रखंड संयोजक संतोष मोकल, भाजपच्या उत्तर भारतीय विभाग मंडळाचे अध्यक्ष केशव यादव, भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचे देविदास खेडकर, पनवेल येथील राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाटील आदींसह सभेला 650 जागृत हिंदूंची उपस्थिती लाभली.
हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी म्हणाले, रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने दुष्प्रवृत्ती नष्ट केल्या तसेच प्रयत्न करण्याची वेळ आता आली आहे यासाठी सर्वांनी हिंदु राष्ट्रासाठी संघटित होऊया.
सनातन संस्थेच्या धनश्री केळशीकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या, प्राचीन काळात आपल्या संस्कृती, परंपरा यांचे पालन होत होते. त्यामुळे सर्वत्र आर्थिक, सामाजिक स्थिरता आणि सुरक्षितता होती, पण आता सेक्युलरवादामुळे धर्म, संस्कृती, परंपरा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभाव मोठा आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. हिंदुत्वनिष्ठ विविध प्रेरणादायी घोषणांनी सभास्थानीचा परिसर दणाणून सोडला होता.