
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
निवडणुकांदरम्यान गोंधळ घालणार्या लोकांवर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून देशभरात 107 कलमाचा वापर केला जातो, मात्र पश्चिम बंगालमध्ये असे होताना दिसत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग देशात एक आणि पश्चिम बंगालमध्ये वेगळी अशी दुटप्पी भूमिका कसे घेऊ शकते, असा सवाल करताना यामुळे आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, अशा शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये व्होटबँकेच्या राजकारणसाठी हिंसाचार सुरू आहे, मात्र तृणमूल काँग्रेसची उलटी गिनती आता सुरू झाली आहे. हरणारी बाजी विजयामध्ये पलटवण्यासाठी हे सर्व सुरू आहे. रोड शोदरम्यान झालेल्या हिंसाचारावरून हे निश्चित झाले आहे. हार स्पष्ट दिसत असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोपही शहा यांनी केला आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने या प्रकरणी त्वरित कारवाई केली पाहिजे, अशी मागणी करताना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना पकडल्याशिवाय येथे निष्पक्ष निवडणूक होणार नाही, असेही शहा यांनी म्हटले आहे. ममतादीदींनी दोन दिवसांपूर्वीच भाजपला बदला घेण्याची धमकी दिली होती, मात्र तरीही त्यांच्या प्रचारावर निवडणूक आयोगाकडून बंदी का घालण्यात आली नाही, असा सवालही या वेळी त्यांनी केला.
तसेच हिंसाचाराची चिखलफेक करून आपण निवडणूक जिंकू असे तुम्हाला वाटत असेल, तर जेवढा चिखल तुम्ही फेकाल तेवढे कमळ पुन्हा फुलेल, अशा शब्दांत अमित शहा यांनी बंगालमध्ये भाजप विजयी होईलच, असा विश्वास व्यक्त केला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper