पनवेल : बातमीदार
मागेल त्याला रिक्षा परवाना देण्याचा नियम लागू झाल्यापासून शहरात रिक्षांची संख्या वाढली आहे. त्यापाठोपाठ रिक्षा संघटनाही वाढल्या आहेत. रिक्षा संघटनांची आपापले रिक्षा थांबे उभारून हद्दी निश्चित केल्या आहेत. त्यामुळे एका संघटनेच्या थांब्यावरील रिक्षाचालक दुसर्या रिक्षा संघटनेच्या चालकाला आपल्या थांब्यावर थांबू देत नाहीत, अशी स्थिती नवी मुंबई, पनवेल परिसरात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. यावरून रिक्षाचालकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. यामुळे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जायचे असल्यास हे रिक्षाचालक मीटरने न जाता दुप्पट भाडे आकारून प्रवाशांना लुटत आहेत.
एकाच परिवहनच्या हद्दीत असे अनेक नियम असल्याने प्रवाशांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. परिवहनचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने यावर तोडगा काढावा, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
पनवेल परिवहन कार्यालयाच्या हद्दीतील अधिकृत रिक्षांची संख्या हजारोंच्या घरात आहे. सध्या मागेल त्याला योग्य कागदपत्रे असल्यास लगेच रिक्षा परवाना दिला जात आहे. त्यामुळे ही संख्या वाढली आहे. कारण दोन वर्षांपूर्वी मर्यादित परवाने दिले जात असताना ही संख्या 5 ते 10 हजारांच्या घरात होती, मात्र असे असले तरी शहरात अनधिकृत फिरणार्या रिक्षांची संख्याही मोठी आहे. शहरात हजार-दीड हजार रिक्षा या अनधिकृतपणे फिरत आहेत. या रिक्षाचालकांकडे वाहन परवानेही नसतात, मात्र परिवहन विभागाकडून त्यावर मागच्या वर्षभरात काहीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे अशा रिक्षाचालकांची मनमानी वाढत आहे. हे रिक्षाचालक आपापल्या रिक्षा संघटनांचा धाक दाखवून रिक्षा थांबे उभारून व्यवसाय करतात, मात्र आपल्या थांब्यांवर इतर रिक्षाचालकांना रिक्षा उभी करू देत नाहीत. जर प्रवासी रिक्षात बसलेच तर मग परतीचे भाडेही आकारले जाते. या भागातील रिक्षाचालक मीटरने रिक्षा चालवण्यास तयार नसतात. थेट ठरलेले मनमानी भाडे आकारूनच प्रवाशांना रिक्षात बसवतात आणि प्रवाशांची लूट करतात. त्यामुळे अशा बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लावणार कोण, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.