पेण : प्रतिनिधी : मान्सुनपूर्व नाले व गटारे सफाईचे काम हाती घेण्यात आले असून, शहरातील 18 पैकी 10 नाल्याची सफाई पूर्ण झाली आहे. उर्वरित नालेसफाईचे काम येत्या 31 मेपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पेण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी दिली.
शहरांतील मान्सुनपूर्व नालेसफाईबाबतचा अहवाल शासनाने 31 मेपर्यंत मागविला आहे. त्या अनुषंघाने मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी काही दिवसांपुर्वी पेण नगर परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेवून, त्यांना आपापली कामे पावसाळा सुरु होण्यापुर्वी जबाबदारीने पार पाडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सध्या पेण नगर परिषदेचा आरोग्य व स्वच्छता विभाग युद्ध पातळीवर नाले सफाईची कामे करण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. पेणमध्ये ज्या ठिकाणी जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले होते, तेथे बांधकाम विभागाकडून डांबरीकरण करण्यात येत आहे. रस्त्यावरील खड्डे भरणे तसेच नगर परिषद प्राथमिक शाळांचे छप्पर व इतर दुरूस्तीची कामे सध्या सुरू असून, जलशुद्धीकरण केंद्र व तेथील पाण्याच्या टाकीची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पाणी शुद्धीकरणासाठी योग्य प्रमाणात आलम, टीसीएल पावडरचा साठासुद्धा करण्यात आला आहे. सर्व पथदिवे सुस्थितीत ठेवण्याचे काम सुरू झाले आहे. विज वाहिन्यांआड येणार्या वृक्ष छाटणीचे काम प्रगतीपथावर आहे.
अतिवृष्टीप्रसंगी भोगावती नदीचा प्रवाह धोकादायक बनतो. अशा वेळी पेण शहरातील सखल भागामध्ये पाणी तुंबून तेथील रहिवाशांना त्याचा फटका बसतो. ही परिस्थिती उद्भवू नये, या बाबीकडे विशेष लक्ष देऊन नगर परिषदेने नालेसफाईच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. शहराबाहेरील मोठ्या नाल्यावर पोकलनद्वारे नालेसफाई करण्याची काम सध्या सुरू असल्याचे मुख्याधिकार्यांनी सांगितले.
पेण शहरात मान्सुनपूर्व नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली असून, आतापर्यंत 45 ते 50 टक्क्याहून जास्त नालेसफाई झाली आहे. उर्वरित कामे येत्या 15 दिवसात पूर्ण करण्यात येतील.
-अर्चना दिवे, मुख्याधिकारी, पेण नगर परिषद