नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस उलटले तरी त्याचे कवित्व चालूच आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात काँग्रेस पक्षातील अंतर्गत दुफळी आणि बेमुर्वतखोरी यांची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे हे मोठ्या फरकाने विजयी झाले. तेच आता काँग्रेस नेत्यांचे पितळ उघडे पाडत आहेत.महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांच्या रिंगणात भारतीय जनता पक्ष संपूर्ण ताकदीने उतरलाच नव्हता ही वस्तुस्थिती आहे. तरीही या निवडणुकांमध्ये भाजपने कोकणातली एक जागा जिंकली आणि नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांच्या रूपाने नवा मित्र जोडला. भाजपचे अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवलेच गेले नव्हते. हा पक्षाचा धोरणात्मक निर्णय होता आणि या डावपेचामध्ये भाजपचीच अंतिमत: सरशी झाली हे उघड आहे. शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीचे गलबत गोते खात होतेच. या वेळीही शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला एकीचे बळ दाखवता आले नाही. आघाडीने जिंकलेल्या तीन जागा कशा पदरात पडल्या हा एक वेगळाच विषय आहे. या तीनपैकी दोन जागा काँग्रेसने जिंकल्यामुळे त्या पक्षात आनंदोत्सव साजरा व्हायला हवा होता. प्रत्यक्षात काँग्रेस नेत्यांचे चेहरे पडलेले दिसत आहेत. सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. नाशिक पदवीधर मतदारसंघात त्यांना उमेदवारी देण्यास काँग्रेस पक्षाची हरकत नव्हती, परंतु सुधीर तांबे यांची इच्छा मात्र आपल्या चिरंजिवांना आमदार करण्याची होती. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना हे मान्य नव्हते. त्यातून एबी फॉर्मचा भलताच घोटाळा निष्पन्न झाला आणि एका नव्या वादाला तोंड फुटले. खरे तर ही जागा काँग्रेसची हक्काची होती आणि सत्यजित यांना उमेदवारी नाकारण्यामागे कोणतेही सबळ कारण नव्हते. परंतु ‘आले नानाजींच्या मना तेथे काही कोणाचे चालेना’ अशी अवस्था झाल्यावर सत्यजित यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला आणि जबरदस्त विजय संपादन करून दाखवला. प्रदेश काँग्रेसने हेतुपुरस्सर चुकीचे एबी फॉर्म पाठवल्याने अपक्ष उमेदवारी जाहीर करावी लागली असा खळबळजनक आरोप करताना सत्यजित यांनी ‘चुकलेले’ एबी फॉर्म भर पत्रकार परिषदेत दाखवले. आता याला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा बेजबाबदारपणा म्हणायचे, पक्ष कार्यालयाचा ढिसाळपणा म्हणायचे की पक्षांतर्गत राजकारण म्हणायचे हे ज्याचे त्याने ठरवावे? तांबे कुटुंब हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे आप्त आहेत. किंबहुना ते सत्यजित यांचे सख्खे मामा आहेत. थोरात यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन काँग्रेस नेत्यांनी डाव साधला आणि तांबे व थोरात कुटुंबीयांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले असा थेट आरोप सत्यजित तांबे यांनी केला आहे. त्याला उत्तरे देताना काँग्रेस नेत्यांची फे-फे उडत असून अन्य पक्षांचे मात्र मनोरंजन होत आहे. सत्यजित तांबे यांना भाजपचे समर्थन होते व म्हणूनच ते प्रचंड मतांनी निवडून आले हे काही लपून राहिलेले नाही. खुद्द सत्यजित यांनीदेखील ते लपवलेले नाही. किंबहुना, देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत असेच ते म्हणाले आहेत. या बेअब्रूमधून प्रदेश काँग्रेस कशी सावरणार हाच प्रश्न आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …