कोशिश फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलच्या ऐतिहासिक वडाळे तलाव येथे महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून कोशिश फाउंडेशनतर्फे दर शनिवारी पनवेलकर रसिकांना उत्तम संगीत पर्वणी मिळत असते. याच श्रृंखलेत सुप्रसिद्ध गायक रायगड भूषण संतोष पाटील यांची मैफल शनिवारी (दि. 25) रंगली.
राग ललतमधील जोगिया मोरे घर या सुप्रसिद्ध बंदीशीने गायक संतोष पाटील यांनी मैफिलीला सुरुवात करून प्रसन्न वातावरण निर्मिती केली. त्यानंतर ‘आधी रचिली पंढरी…’ आणि ‘इंद्रायणी काठी…’ हे सुप्रसिद्ध अभंग सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. ‘अबीर गुलाल…’ हा अभंग इतका छान सादर झाला की एका संगीत रसिकाने मला जणू विठ्ठलच भेटल्याचा भास झाला अशी प्रतिक्रिया दिली. ‘अवघा रंग एक झाला…’ ही भैरवी सादर करून मैफिलीची सांगता करण्यात आली.
मैफिलीला उत्तम साथसंगत हार्मोनियमवर अथर्व देव व तबल्यावर आदित्य उपाध्ये या दोन गुणी युवा कलाकारांनी केली. हे दोघेसुद्धा अतिशय मेहनती कलाकार आहेत आणि त्याचे सांगीतिक भविष्य उज्ज्वल आहे यात शंकाच नाही, अशी प्रतिक्रिया माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केली. त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथी माजी नगरसेवक नितीन पाटील व संस्कार भारती उत्तर रायगडचे महामंत्री अॅड. अमित चव्हाण यांचे स्वागत केले तसेच मान्यवरांच्या हस्ते गायक कलाकारांचा सन्मान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अभिषेक पटवर्धन यांनी पाहिले.