Breaking News

सलग सुट्ट्यांमुळे वाहतुकीचे तीन तेरा

खोपोली/खालापूर ः प्रतिनिधी

खोपोली-पाली आणि खोपोली अलिबाग, पेण मार्ग जेथे एकत्र मिळतात त्या खालापुरातील पाली फाट्यावर शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. काही वाहने वाहतूक कोंडी टाळून पाली मार्गावर जाण्यासाठी ताकई ढेकू औद्योगिक वसाहतमार्गे ठाणे न्हावे गावावरून जात असता या मार्गावरही वाहनांची वर्दळ झाल्याने हा मार्गही दोन तास जाम झाला होता, तर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील सावरोली टोल नाक्यावरही काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

  बुद्धपौर्णिमा, शनिवार-रविवार सलग सुट्या आणि शाळा-कॉलेजचाही व्हेकेशन कालावधी असल्याने मोठ्या संख्येने वाहनांच्या वर्दळीने पाली फाटा येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.  कोकणात तसेच अ‍ॅडलॅब थिमपार्क, अष्टविनायक, पाली अलिबागच्या दिशेने जाणारी प्रवासी वाहने काल खोपोली-पाली-पेण रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत होते. त्यात लग्नसराई असल्याने स्थानिक वाहनेही मोठ्या संख्येने खोपोली-पाली-पेेण मार्गावर उतरल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली.

 खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील, महामार्ग यंत्रणेचे पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. पुजारी, कोंडे, संकेश्वर, बोरघाट पोलीस ठाण्याचे कर्मचारी, खालापूर सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार, खोपोलीचे संदीप येडेपाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग किसवे यांनी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विशेष प्रयत्न केले. महामार्ग पोलीस, सुरक्षा बलाचे जवान, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्सच्या जवानांनीही त्यांना साथ दिली. स्थानिक  तरुणांनी ठिकठिकाणी मदत केल्याने दोन तासांत वाहतूूक कोंडी सुटण्यास मदत झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. बोरघाटात स्थानिकांनी प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply