सह्याद्री प्रतिष्ठानची स्वच्छता मोहीम; 34 तोफा दगडी चौथर्यांवर
अलिबाग, रेवदंडा : प्रतिनिधी : दुर्गसंवर्धनाचा वसा घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने रेवदंडायेथील आगरकोट किल्ल्यावरील अडगळीत पडलेल्या तोफांना उर्जितावस्था प्राप्त करून दिली आहे. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवत तेथील तोफा व्यवस्थित रचून ठेवल्या.
संस्थेच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून रेवदंडा येथील आगरकोट किल्ल्यावर ही मोहीम सुरू करण्यात आली होती. सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओमकार तांबडकर, हर्षल घरत, अनिल ठाकूर, आकाश वर्तक, महादेव बापट, पोलीस पाटील स्वप्नील तांबडकर यांच्यासह जवळपास 70शिवप्रेमींनी या मोहीमेत भाग घेतला. स्वच्छता मोहीमेमुळे किल्ल्यावरील अडगळीच्या वाटा मोकळया झाल्या असून पर्यटक आणि शिवप्रेमींसाठी चांगला मार्ग उपलब्ध झाला आहे. या किल्ल्याच्या परिसरात वस्ती आहे, मात्र किल्ल्याच्या दुरवस्थेकडे कुणाचेच लक्ष नव्हते. सह्याद्री प्रतिष्ठानने स्थानिक तरूणांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आणि सारे कामाला लागले.
या स्वच्छता मोहीमेबरोबरच किल्ल्यावरील अडगळीत पडलेल्या, मातीखाली गाडल्या गेलेल्या तब्बल 34 तोफा बाहेर काढून त्या दगडी चौथर्यांवर रचून ठेवण्यात आल्या. त्यांची नोंदणी करून त्यांना क्रमांक देण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग अध्यक्ष संजय पाडेकर, उपाध्यक्ष आषिश थळे, दुर्गसंवर्धन विभाग अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी या मोहीमेचे नेतृत्व केले.
सह्याद्री प्रतिष्ठान
सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर दुर्ग संवर्धन कार्य गेल्या दहा वर्षापासून करत आहे. संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे आणि कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाने ही दुर्ग संवर्धन चळवळ होत आहे. संस्थेने आजवर 700 हून अधिक दुर्ग संवर्धन मोहिमा तर 1700 दुर्गदर्शन मोहिमा राबविल्या आहेत. तुंग, तिकोना, कर्नाळा, गोरखगड, तोरणा किल्ल्यावर लाकडी प्रवेशद्वार तसेच कोरीगड, कोर्लई 6 तोफगाडे, सिंहगड, किल्ल्यावर तोफगाडे बसवण्यासाठी पुढाकार तर कुलाबा किल्ल्यावरील तीन तोफा आणि सिंहगडावर दोन टन वजनी मोठया तोफेस गाडे बसविण्यात आले. तसेच जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरुपी राष्ट्रध्वज उभारण्यात यश मिळवले. संस्थेने महाराष्ट्रातील 200किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य पुरातत्व विभागाला 200 पत्रे देऊन त्याचा संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा सुरु आहे. तसेच मार्च 2016मध्ये संस्थेने महराष्ट्रातील 300 किल्ल्यांवर एकाच दिवशी भगवाध्वज आणि संवर्धन मोहीम राबवली या उपक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकोर्ड मध्ये नोंद झाली आहे.
आगरकोट किल्ला आणि त्यावरील ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित राहिला आहे. सह्याद्री प्रतिष्ठानने तो जपण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. या किल्ल्यावर सापडलेल्या तोफांची नोंदणी करण्यात आली असून, त्यासंदर्भातील सविस्तर अहवाल संस्थेमार्फत राज्य सरकार तसेच पुरातत्व विभागाला सादर केला जाईल.
-गणेश रघुवीर, अध्यक्ष, दुर्गसंवर्धन विभाग, सह्याद्री प्रतिष्ठान
RamPrahar – The Panvel Daily Paper