आठ वर्षांनी सुरू झाले पथदिवे

पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील सरसगडाच्या पायथ्याशी तळई आणि दापोडे या आदिवासीवाड्या आहेत. त्या पाली ग्रामपंचायत हद्दीत येतात. मात्र गेल्या आठ वर्षांपासून तेथील पथदिवे बंद होते. त्यामुळे या आदिवासी बांधवांची गैरसोय होत होती. पाली ग्रामपंचायती तर्फे वीज जोडणी सुरळीत करून नुकतेच हे पथदिवे सुरु करण्यात आले. त्यामुळे आदिवासी बांधवांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले.
काही दिवसांपुर्वी पालीचे उपसरपंच विजय मराठे यांनी दापोडे आदिवासी वाडीवर रात्री फेरी मारली, तेव्हा त्यांना वाडीवर सर्वत्र अंधार दिसला. वाडीवर पथदिवे असूनही ते लावले गेले नाहीत, म्हणून वायरमनला बोलावून ते तपासले. तेव्हा पथदिव्यांबरोबरच खांबावरील वीज पुरवठा मागील 8 वर्षांपासून बंद असल्याचे समजले. ग्रामपंचायतीचे वायरमन रामा शिंगवा यांनी खांबावरील वीज जोडणी पूर्ववत करुन, पथदिवे सुरू केले.
बर्याच वर्षाने वाडीतील खांबांवरील दिवे प्रकाशमान होऊ लागल्यामुळे रात्री उशीराही बिनधास्तपणे वाडीत येता येते. तसेच रात्री शेजारीपाजारी जायला भिती वाटत नाही.
-अक्षय हिलम, ग्रामस्थ, तळई आदिवासीवाडी, पाली-सुधागड
RamPrahar – The Panvel Daily Paper