Breaking News

अलिबागमध्ये भाजप दक्षिण रायगड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन

महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करा -ना. रवींद्र चव्हाण

अलिबाग : प्रतिनिधी
महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणायची आहे. त्यामुळे मानपानाचा विचार न करता विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. अलिबाग विधानसभा मतदारसंघात आमदार महेंद्र दळवी हे महायुतीचे उमेदवार असून त्यांना विजयी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिले.
अलिबामध्ये भाजप दक्षिण रायगड जिल्हा कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. 9) राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील, ज्येष्ठ नेते सतीश धारप, सहकार आघाडीचे कोकण विभाग सहसंयोजक गिरीश तुळपुळे, भाजप जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. महेश मोहिते, मिलिंद पाटील, बिपीन म्हामुणकर, गीता पालरेचा, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मपारा, अ‍ॅड. पल्लवी तुळपुळे, अलिबाग तालुका अध्यक्ष उदय काठे, जिल्हा चिटणीस सतिश लेले, कोषाध्यक्ष हेमंत दांडेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी नवनियुक्त पदाधिकार्‍यांना मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
दिल्लीत जसे भाजपचे कार्यालय आहे तसे प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय असले पाहिजे असे पक्षाने ठरविले आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत असे भाजप कार्यालय बांधण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यात कार्यालये बांधण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यातदेखील अलिबागमध्ये कमळ भवन उभारण्यात येईल, असे सांगून भाजपचे कार्यालय हे जनसामान्यांना आपले कार्यालय वाटले पाहिजे. येथून जनसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. या कार्यालयातून शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. मी स्वतः या कार्यालयात येऊन पक्ष संघटना वाढविण्यासाठी वेळ देणार आहे, असे मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले.
भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनी म्हटले की, भाजपचे कार्यालय म्हणजे मंदिर आहे याचे भान राखायला हवे. पक्षाच्या कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. सार्वजनिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जनतेला या कार्यालयाची उपयुक्तता कळायला हवी आणि हे कार्यालय सर्वसामान्यांचे आश्रयस्थान झाले पाहिजे.
ज्येष्ठ नेते सतीश धारप यांनी हे कार्यालय रायगड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांसाठी आधार ठरणार आहे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दोन महिन्यातून एकदा या कार्यालयात यावे तसेच खासदार व आमदारांनी महिन्याचा दिवस ठरवून या कार्यालयात यायला हवे, असे प्रास्ताविकात सांगितले. सतीश पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply