लंडन : वृत्तसंस्था
प्रत्येक खेळाडूचे भारताकडून खेळायचे स्वप्न असते. त्याचबरोबर विश्वचषकाच्या संघात आपल्याला स्थान मिळावे आणि वर्ल्ड कप जिंकून तो आपल्या हातात घेऊन उंचवावा, असे प्रत्येक खेळाडूला वाटत असते. काही जणांची स्वप्ने खरी होतात, तर काहींची स्वप्न धुळीस मिळतात. असेच एक स्वप्न त्यानेही पाहिले होते आणि आज ते सत्यात उतरले आहे. भारताने 2011 साली विश्वचषक जिंकला होता, त्या वेळी तो आपल्या मित्रांबरोबर सेलिब्रेशन करण्यात मग्न होता, पण सध्याच्या भारताच्या विश्वचषकाच्या संघात त्याने आपले स्थान निश्चित केले आहे.
आता हा खेळाडू नेमका कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. काही दिवसांपूर्वी या खेळाडूने आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये या खेळाडूने आपल्या मित्रांबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो भारताने 2011 साली जेव्हा विश्वचषक जिंकला होता त्या वेळी केलेल्या सेलिब्रेशनचा आहे, असे त्याने म्हटले आहे. तो खेळाडू आहे भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या.