Breaking News

सुनहरा संसार 50 वर्ष!

आजचा चित्रपट अनेक बाबतीत खूपच पुढे गेलाय. आजच्या कलाकारांचेच बघा. त्यांना एखाद्या विशिष्ट चौकटीत/प्रतिमेत (इमेजमध्ये) अडकणे मंजूर नाही.
अमिताभ बच्चनचेच बघा. तो आजच्या पिढीचा कलाकार कसा हो असा थेट प्रश्न तुम्ही नक्कीच कराल. अहो, त्याच्याच काय, कोणाच्याच वयावर जाऊ नका. तो आज प्रत्येक चित्रपटात वेगळा असतो. ‘ब्लॅक’मधला वेगळा, ‘पा’मधला एकदमच वेगळा काल्कीमधला त्याहीपेक्षा वेगळा.
पन्नास वर्षापूर्वी असे नव्हते. फरिदा जलालने शक्ती सामंता दिग्दर्शित ‘आराधना’मध्ये (1969) पित्याच्या भूमिकेतील राजेश खन्नाची नायिका शर्मिला टागोर असताना पुत्र राजेश खन्नाची नायिका साकारली आणि तिला सहनायिकेच्याच भूमिका मिळत गेल्या. रवि टंडन दिग्दर्शित मजबूर (1974)मध्ये अमिताभ बच्चनची बहिण साकारल्यावर त्याच पठडीतील भूमिका तिला कराव्या लागल्या.
नायिका ही सर्वगुणसंपन्न असे. छान छान आकर्षक दिसणे, गोडधोड बोलणे, नायकासोबत प्रेम दृश्यात व गाण्यात रंग भरणे हेच तिचे पडदाभर काम. खलनायिका म्हणजे भडक मेकअप, तोकडे कपडे, व्हीलनला कंपनी देणे, एकादा क्लब डान्स करणे (त्याला फिल्मी भाषेत कॅब्रे डान्स का म्हणत?) हीच तिची ठरलेली कामे.
असे सगळेच सेटिंग/फिटींग असतानाच रुपडे नायिकेचे आणि काम नकारात्मक असाही एक फंडा असे. ड्रीम गर्ल म्हणून इमेज/ओळख/ लोकप्रियता असलेल्या हेमा मालिनीने तशी नकारात्मक व्यक्तिरेखा साकारणे ही आश्चर्यचकित करणारी गोष्ट. काही झाले तरी ड्रीम गर्ल हेमा मालिनी सिनेमात का असेना, पण निश्चितच कसलेच वाईट कृत्य करणार नाही हा तिच्या तर झालेच, पण हिंदी चित्रपटावर बेहद्द प्रेम करणार्‍यांचा शंभर टक्के विश्वास. ही खरंतर जमेची बाजू आहे. पिक्चर कोणताही असो हेमा मालिनी सकारात्मक गोष्टीच करणार आणि त्याचसाठी दिग्दर्शकाने तिची निवड केली आहे ही एक प्रकारची श्रद्धा. रूपेरी पडद्यावरील कलाकारांना आपलेसे मानणे ही आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षक संस्कृतीतील एक फंडा.
अशातच ‘सुनहरा संसार’ (मुंबईत प्रदर्शित 21 फेब्रुवारी 1975. पन्नास वर्ष पूर्ण झालीदेखील)ची रेडिओ विविध भारतीवर, मुद्रित माध्यमातून पूर्वप्रसिद्धी सुरू होताच त्यात म्हटले जाई, हेमा मालिनी अलग अंदाज मे…. चित्रपटात राजेंद्रकुमार, माला सिन्हा यांच्यासह हेमा मालिनी. सत्तरच्या दशकाच्या मध्यापर्यंत राजेंद्रकुमार व माला सिन्हा हे मागील पिढीतील नायक नायिका म्हणून ओळखले जात होते. धुल का फूल, देवरभाभी, गीत इत्यादी चित्रपटात त्यांनी एकत्र भूमिका साकारलेली. साठच्या दशकात राजेंद्रकुमार ज्युबिली कुमार म्हणून ओळखला जाई. त्याचा प्रदर्शित होणारा जवळपास प्रत्येक चित्रपट हमखास पंचवीस आठवड्यांचा मुक्काम करे. राजेश खन्नाचा झंझावात सुरू होताच शम्मी कपूर, राजेंद्रकुमार यांची हिरोगिरी गोत्यात आली. सुनील दत्तही काही काळ मागे पडला. या चित्रपटसृष्टीत सुपरहिट चित्रपट म्हणजेच बरेच काही असते. अमिताभ बच्चनचा अ‍ॅन्ग्री यंग मॅन अर्थात सूडनायकाचे वादळ येताच राजेश खन्नाचीही काही काळ पडझड झाली. नायिकांचेही तरुण युग आले होते आणि हे प्रत्येक काळात होतच असते. नवीन पिढी येणार, त्यात जुन्यांनी बदलून वा जुळवून घ्यायचे असतेच. अमिताभ बच्चननने ते नवीन पिढीतील दिग्दर्शकांशी जुळवून घेत घेत अस्सल व्यावसायिकता दाखवली.
ए. सुब्बाराव दिग्दर्शितसुनहरा संसार हा त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या पंडती कपूरम (1972) या तेलगू चित्रपटाची रिमेक. मूळ गोष्ट एम. प्रभाकर रेड्डी यांची, हिंदीत इंदर राज आनंद यांनी लेखन केले. मूळ साचा तसाच ठेवून हे चित्रपट रिमेक होत. साठच्या दशकापासून दक्षिण भारतीय प्रादेशिक भाषेतील चित्रपटाची रिमेक संस्कृती आलीय. त्या काळात अधूनमधून भूत मेरा साथी, अप्पू राजा असे काही साऊथचे चित्रपट हिंदीत डब होऊन येत. बाहुबली (2014)पासून ते मुख्य प्रवाहात आले आणि ग्लोबल युगातील डिजिटल पिढीसमोर ते पॅन इंडिया म्हणून स्थिरावलेत. त्यांचा आपला हुकमी प्रेक्षकवर्ग वाढत वाढत गेला.
भरपूर कौटुंबिक सामाजिक पण काहीसे भडक नाट्य हे त्या काळातील साऊथच्या पिक्चर्सचे वैशिष्ट्य. सर्वसामान्य प्रेक्षक त्यात गुंतत जाई.
शंकरलाल (ओम प्रकाश) यांचे धाकटे तीन भाऊ मधु (रमेश देव), चंद्रशेखर (राजेंद्रकुमार) आणि रवि (रोमेश शर्मा), आणि त्यात शंकरलालच्या पत्नीची शेवटची इच्छा असते चंद्रशेखरने लक्ष्मी (माला सिन्हा)शी लग्न करावे. त्याच सुमारास मधु जिल्हा अधिकारी म्हणून याच गावात बदली झाल्याने येतो. मधु चमन (डेव्हिड) यांची मुलगी शोभा (सीमाताई देव) यांच्याशी विवाहबद्ध होतो. गावातील मोठ्या घरात हे एकत्र कुटुंब वावरत असताना अधूनमधून चंद्रशेखर व मधु यांच्यात खटके उडत असतात. त्यासह हे कुटुंब वाटचाल करीत असताना चंद्रशेखर व लक्ष्मी यांना एकेक करत तीन मुलेही होतात. ती छोटा काका रविसोबत खेळतात, गातात. अशातच गावातील मोठ्या प्रतिष्ठित कारखान्याची मालकीण सविता अर्थात राणी पद्मावती (हेमा मालिनी) कामगारांच्या संपाने, मागण्याने हैराण असते, संतापलेली असते आणि या संपाचे नेतृत्व चंद्रशेखरकडे असल्याने तर तिचा राग अनावर झाला होता. ती चंद्रशेखरवर चोरीचा आळ आणते. इतक्यावरच ती थांबत नाही. ती चंद्रशेखरच्या कुटुंबाची जमीन व संपत्तीही हडप करते.
हे सगळे ती सूड म्हणून करीत असते. पण का? तर चंद्रशेखर व सविताचे पूर्वसंबंध…
साऊथच्या पिक्चरमध्ये अशा गोष्टी भरपूर नाट्यमय दृश्य, जोरदार संवाद, गीत संगीताची रेलचेल यातून मांडली जाई. मूळ पिक्चर सुपर हिट असल्यानेच त्याची रिमेक बनणे हा अलिखित नियमच. चित्रपटात रमेश देव व सीमाताई देव हे पती पत्नीच्या भूमिकेत हे उल्लेखनीय. रमेश देव यांनी दूरदृष्टी ठेवून साठच्या दशकातच हिंदी चित्रपटातून भूमिका साकारण्यास सुरुवात केली आणि आपला ठसा तेथेही उमटवला.
दिग्दर्शक ए. सुब्बाराव हे तेलगू चित्रपटात यशस्वी. आपल्याच सुपर हिट चित्रपटांची त्यांनी हिंदीत सातत्याने रिमेक केली. मिलन (1967), मन का मीत (1969), डोली (1969), दर्पण (1970), मस्ताना (1970), रखवाला (1971), जीत (1972), इन्साफ (1973), ज्वार भाटा (1973)हे त्यांनीच दिग्दर्शित केलेले चित्रपट. तेलगूतही असेच सातत्य. एका वर्षात दोन चित्रपट हे सातत्य केवळ कामावरचा फोकस कायम ठेवल्यानेच शक्य असते. माणसं उगाच मोठी होत नाहीत. गुणवत्ता आणि व्यावसायिक शिस्त यांची ते सांगड घालतात.
आनंद बक्षी यांच्या गीतांना नौशाद यांचे संगीत हा योग या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच जुळून आलेला आणि किशोरकुमारही पहिल्यांदाच नौशाद यांच्या संगीत नियोजनात गायलेला. हॅलो हॅलो क्या हाल है (आशा भोसले व किशोरकुमार) हे ते गाणे. चित्रपटाने मुंबईत मेन थिएटर स्वस्तिक चित्रपटगृहात शंभर दिवसांचा मुक्काम केला. चित्रपट सर्वसाधारण असूनही हे बरे यश म्हणायचे.
हेमा मालिनी नकारात्मक भूमिकेत ही गोष्ट रंजक. (नकारात्मक म्हणजे खलनायिका अथवा व्हॅम्प नव्हे हेही सांगायलाच हवे.) बरं हे पहिल्यांदाच घडत नव्हते. एफ.सी. मेहरा निर्मित व सुशील मुजुमदार दिग्दर्शित ‘लाल पथ्यर’मध्ये (1972) सौदामिनी ही अशीच नकारात्मक भूमिका होती. राजकुमार, हेमा मालिनी, राखी गुलजार, विनोद मेहरा इत्यादींच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची राजघराण्यातील गोष्ट अनेक वळणे घेत घेत रंगते. ती गुंतागुंत चित्रपट रसिकांना अजिबात आवडली नाही. चित्रपट समजायला सोपा असावा हीच पहिली अपेक्षा असते. रांगेत उभे राहून एकदाचे तिकीट मिळवायचे आणि त्याच पब्लिकला कोड्यात टाकायचे हे कसे आवडणार?
‘सुनहरा संसार’देखील साधारण यशावर थांबला. गंमत कशी ती बघा, 1975 साल अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण. हिंदी चित्रपटाच्या क्षेत्रात एकदम वेगळेच. 24 जानेवारीला ‘दीवार’, 31 जानेवारीला ‘आयना’, 14 फेब्रुवारीला ‘आंधी आणि रफ्तार’, 21 फेब्रुवारीला ‘सुनहरा संसार’, 28 फेब्रुवारीला ‘दफा 302’, 30 मे ‘जय संतोषी मां’ असे करत करत 1975 रंगत रंगत गेले.
आणखी एक विशेष प्रकाश मेहरा दिग्दर्शित हाथ की सफाई (1974) या चित्रपटात लहानपणी पहिल्याच रिळात हरवलेले दोन भाऊ (रणधीर कपूर व विनोद खन्ना) शेवटच्या रिळात एकमेकांना ओळखतात या मसाला मिक्स पिक्चरमध्ये हेमा मालिनीने तू क्या जाने बेवफा असा उगाच भडक वाटावा असा क्लब डान्स साकारल्याने अनेक जण अचंबित झाले होते. अतिशय लयबद्ध आणि उत्तम असे ते नृत्य होते, पण हेमा मालिनीने ते साकारावे? असा प्रश्न अनेकांना पडला होता.
कलाकाराने त्याच्या इमेजपेक्षा काही हटके केले की हे असं होण्याचे ते दिवस होते. ‘सुनहरा संसार’ तसाच. त्याच्या प्रदर्शनास पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हा फोकस. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला पन्नास वर्षांपूर्वीच्या चित्रपटांबाबत असलेल्या उत्सुकतेत हाही एक चित्रपट.

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समिक्षक)

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply