चौक : प्रतिनिधी
केंद्र सरकारची पीएम जनमन योजना आणि राज्यातील आभा योजना या दोन्ही योजनांद्वारे कातकरी समाजासह सर्व आदिवासी कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प केंद्र आणि राज्य सरकारने केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकार्यांनी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, जेणेकरून 13 विभागांच्या विविध योजनांची माहिती आदिवासी बंधू-भगिनींपर्यंत पोहचेल, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शुक्रवारी (दि. 2) दिले.
खालापूर तालुक्यातील बोरगाव आंबेवाडी येथे आयोजित आदिवासी संवाद मेळाव्यात मंत्री डॉ. उईके बोलत होते. या मेळाव्याला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप उत्तर अध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, तालुका मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे, वासांबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा पारंगे, ज्येष्ठ नेते विनोद भोईर, बोरगाव सरपंच प्रणिता मोरे, माजी सरपंच राजू मोरे, रामदास ठोंबरे, गणेश कदम, प्रितेश मोरे, तुपगाव सरपंच रवींद्र कुंभार, रवी बांगरा यांच्यासह सरपंच, सदस्य, अधिकारी, कार्यकर्ते आणि आदिवासी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री डॉ. उईके पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएम जनमनसारख्या धोरणात्मक योजनांच्या माध्यमातून कातकरी व इतर आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. राज्य सरकारनेसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आभा योजना जाहीर केली असून तिचा 100 दिवसांचा कृती आराखडा आखण्यात आला आहे. या भागाचे आमदार महेश बालदी कार्यक्षम असून त्यांच्या आग्रहाखातर मी या ठिकाणी आपल्या समस्या ऐकण्यासाठी आलो आहे, असेही मंत्रीमहोदयांनी या वेळी नमूद केले.
या वेळी आमदार महेश बालदी यांनी, या आदिवासी भागात येऊन समस्या ऐकून घेणारा आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर आदिवासी मंत्रीमहोदयांना इथे आणणारा मी पहिला आमदार असल्याचे सांगून हशाचीपट्टीसह इतर आदिवासी बंधू-भगिनींसाठी मंजूर केलेल्या केलेल्या कामांची माहिती दिली. आदिवासींसाठी आपण आरोग्यसेवा कक्ष स्थापन केला असून त्याचा लाभ द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविक मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे यांनी केले. मेळाव्यापूर्वी मंत्रीमहोदयांनी स्थानिक आदिवासी समाजाशी संवाद साधून योजनांची अंमलबजावणी कशी होते याचा आढावा घेतला व समाधान व्यक्त करीत ही वाटचाल निश्चितच आदिवासी समाजाला समृद्धीकडे घेऊन जाणारी आहे, असे सांगितले.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper