भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे गौरवोद्गार
पनवेल ः रामप्रहर वृत्त
लोकनेते रामशेठ ठाकूर हे दानशूरता आणि लोकहिताचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. लोकांच्या दुःखात सहभागी होण्याबरोबरच आपल्या वैभवाचा उपयोग त्यांनी समाजकल्याणासाठी केला आहे, असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खांदा कॉलनी येथे अमृतमयी कीर्तन महोत्सवात केले.
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, सांस्कृतिक, वैद्यकीय अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 74वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. अमृत महोत्सव वर्षाची सुरुवात संतांच्या वाणीच्या गोडव्याने अर्थात अमृतमयी कीर्तन महोत्सव 2025ने झाली असून त्यानिमित्त गुरूतुल्य कीर्तनकार महाराजांचा सत्कार भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या सोहळ्याला लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, प्रल्हाद केणी, संजय भगत, अनंतमहाराज पाटील, निलेश महाराज तसेच गुरूतुल्य कीर्तनकार आदी व्यासपीठावर उपस्थित होते, तर हजारोंच्या संख्येने वारकरी संप्रदायातील मंडळी उपस्थित होती.
रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना सांगितले की, व्यासपीठ आणि माझ्यासमोर बसलेल्या सर्वांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याबद्दल माझ्यापेक्षा नक्कीच अधिक माहिती असेल, परंतु अशी फार कमी माणसं असतात की जी दुसर्याच्या दुःखामध्ये सहभागी होतात. पैसा बर्याच जणांकडे असतो, पैसे बरेच जण वेगवेगळ्या मार्गातून कमवत असतात, परंतु मला मिळालेले हे जे वैभव आहे या वैभवाचा मी खरा वाटेकरी नाही, तर हे मला लोकांचे दुःख दूर कमी करण्यासाठी माझ्याकडे येतंय असा विचार करणारी फार कमी व्यक्ती आहेत. मी पाहिलेले असे दानशूर व्यक्तिमत्व जर कोणत असेल तर ते लोकनेते रामशेठ ठाकूर आहेत आणि हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते. अभिमान यासाठी वाटतो की अशा थोर व्यक्तींचा सहवास आणि या सहवासातूनसुद्धा आपल्याला बरंच काहीतरी शिकता आले आहे.
खरंतर अशी थोर मंडळी किंवा या मंडळींचा सहवास हा तुम्हा आम्हा सर्वांना एक वेगळ्या पद्धतीचा एक आदर्श निर्माण करत असतो आणि भावी पुढच्या पिढीला एक आदर्शवत असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी उचललेले पाऊल आणि ते पाऊल पडल्यानंतर त्यांना मिळालेले यश कशामुळे मिळते तर आज वयाच्या 74व्या वर्षीसुद्धा कष्ट करण्याची जिद्द. त्यांनी एकदा ठरवले की मला हे काम पूर्ण करायचे आहे, तर ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांची असणारी जिद्द चिकाटी आणि देण्यात येणारा वेळ आणि कामाचे नियोजन. त्याचबरोबर आपल्यासोबत असणार्या प्रत्येक छोट्या मोठ्या सर्व सहकार्यांना घेऊन त्या कामाला सिद्धीपर्यंत पोहचवण्यासाठी रात्रीचा दिवस करतात. एकदा संकल्प केला की त्याला सिद्धीस नेण्याचे काम ते करतात. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये शिक्षक म्हणून सुरुवात केली. एखादा शिक्षक म्हणून त्यांनी केलेली सुरुवात आणि आज रायगड असेल किंवा ठाणे जिल्ह्यात ज्या वास्तू ज्याला ज्ञानमंदिर म्हटले जाते. या ज्ञानमंदिरांच्या निर्माणामध्ये त्यांनी दिलेले योगदान हे महत्त्वपूर्ण असून आज विविध क्षेत्रांमध्ये असणारे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. दानशूरपणा, सामाजिक तळमळ अशा बर्याचशा गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. त्यामुळे एक फार मोठा वारसा त्यांनी सर्वांना दिलेला आहे आणि हा वारसा खर्या अर्थाने पुढे नेणे हे अत्यंत गरजेचे आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने सांगतो की, परकियांनी आपली असणारी श्रद्धास्थाने त्या वेळच्या काळामध्ये भंग करण्याचे काम केले आणि त्यानंतरच्या काळामध्ये राजमाता अहिल्यादेवींनी मंदिरांचे जतन व संवर्धन करण्याचे काम केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही रायगडसह जवळपासच्या असणार्या या सर्व जिल्ह्यांमध्ये मंदिरांच्या निर्माणासाठी योगदान दिले आहे. या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने वैष्णवांचा मेळा या ठिकाणी आहे. वारकरी सांप्रदाय आणि परंपरा टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असते. लोकनेते रामशेठ ठाकूर हे नेहमी या संत मंडळींच्या पाठीशी राहिले आहेत. त्यांच्याकडून विचार आणि आदर्शाचा वारसा मिळाला आहे. त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना ईश्वराकडे करतो, असेही चव्हाण यांनी या वेळी नमूद केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper