शेल इंडियाच्या कामगारांना तब्बल एक लाख 20 हजार रुपये बोनस
पनवेल : रामप्रहर वृत्त
देशातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण असलेल्या दीपावलीनिमित्त कामगारांना त्यांच्या आस्थापनांकडून बोनस दिला जातो. यंदा रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये बोनस वाटपाच्या चर्चांना वेग आला असताना आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल कामगार संघटनेने कामगारांच्या हिताचे भक्कम प्रतिनिधित्व करून तळोजा औद्योगिक क्षेत्रातील शेल इंडिया मार्केट्स प्रा.लि.मधील कामगारांना तब्बल एक लाख 20 हजार रुपयांचा सर्वाधिक बोनस मिळवण्यात यश संपादन केले आहे.
याचबरोबर पुढील वर्षी एक लाख 25 हजार रुपये आणि त्या पुढील वर्षी एक लाख 30 हजार रुपये कामगारांना बोनस देण्यात येणार आहे. त्या संदर्भातील करार कंपनी आणि कामगार संघटनेत झाला. या करारावर व्यवस्थापनाच्या वतीने अधिकारी शशांक शेखर व गुलशन चौधरी यांनी, तर संघटनेच्या वतीने अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी तसेच कामगार प्रतिनिधींनी स्वाक्षर्या केल्या. या कंपनीतील बहुतांश कामगारांनी संघटनेचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर कामगारांना भरघोस पगारवाढ व सुविधा देण्यात आल्या होत्या. आता जिल्ह्यात सर्वाधिक बोनस मिळाला आहे. संघटनेच्या या यशामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
संघटनेचे सल्लागार लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांची संघटनेचे पदाधिकारी व कामगार प्रतिनिधींनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देत आभार मानले. या वेळी रामदास गोंधळी, सुनील पाटील, यासिम शेख, अनिल पावशे, जयराम जाधव, सुनील हरिश्चंद्रकर आदी उपस्थित होते.
संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, कामगारांचे हक्क मिळवण्यासाठी संघटना सदैव तत्पर असते. या वर्षीही अनेक चर्चांनंतर कामगारांना योग्य तो बोनस मिळवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. कामगार आणि कंपनी यांचे नाते घट्ट असले पाहिजे, कारण त्यामुळे कंपनी आणि कामगार यांचे भले होते. जय भारतीय जनरल कामगार संघटना कामगारांच्या हक्कासाठी लढत असते. त्यामुळे ती जबाबदारी घेऊन संघटना काम करत असते, असेही घरत यांनी नमूद केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper