Breaking News

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल 26 जानेवारी रोजी जाहीर झाला. यामध्ये पनवेल महानगरपालिकेचे बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
राज्यातील एकूण 29 महापालिकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता. नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई अशा मोठ्या व अनुभवी महापालिका स्पर्धेत असताना पनवेल महापालिकेने आपला झेंडा फडकवला असून याबाबत विशेष कौतुक होत आहे.
पनवेल महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या नेतृत्वात परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे व संगणक विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या टीमने हा बहुमान पटकावला. या महापालिकेने यापूर्वीही 100 दिवसांचा प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमामध्ये उत्तम कामगिरी बजावत तिसरा क्रमांक प्राप्त केला होता.
150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये महापालिकेचे संकेतस्थळ वापरण्यास सुलभ, सुरक्षित, अद्ययावत असणे, महापालिकेचे डॅशबोर्ड विकसित करणे, आपले सरकार अंतर्गत नागरिकांना विहित वेळेत सुलभतेने सेवा पुरवणे, कार्यालयात ई-ऑफिसचा प्रभावी वापर करणे, व्हॉटस अ‍ॅप चॅटबोटचा वापर करणे, एआयचा वापर करणे, जीआरएसचा वापर करणे अशा घटकांचा समावेश होता.
आयुक्त चितळे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यावर लगेचच कार्यालयात ई-ऑफिस सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे आयुक्तांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या पनवेल कनेक्ट अ‍ॅपद्वारे नागरिकांना सुलभ सेवा प्रदान करता आल्या. याचा मोठ्या प्रमाणात फायदा या स्पर्धेसाठी झाला. या सर्व घटकांचे सादरीकरण 10 जानेवारी रोजी महापालिकेने सादर केले होते. या स्पर्धेचे मूल्यांकन क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्थेने केले.
तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांची प्रेरणा व विद्यमान आयुक्त चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन व्यवस्थापक गावडे, उपायुक्त खारगे यांच्या नेतृत्वाखाली विभागप्रमुख वर्षा पालवे व कर्मचारी यांनी या यशासाठी विशेष मेहनत घेतली.

Check Also

शिवसेनेच्या सोनल घरत यांचा अर्ज मागे

भाजप महायुतीच्या उमेदवार जिज्ञासा किशोर कोळी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत …

Leave a Reply