पनवेल : प्रतिनिधी
खांदा वसाहतीत विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत. या संदर्भात सोमवारी नगरसेविका सीता पाटील यांनी कार्यकारी अभियंता व्ही. एल. कांबळे यांची भेट घेतली. त्यानुसार मान्सूनपूर्व साफसफाई, रस्त्यासह इतर कामे त्वरित करण्याची मागणी केली. त्यानुसार कार्यवाही करण्याची ग्वाही देण्यात आली.
सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पदभार स्वीकारल्यापासून सिडको हद्दीत नागरी सुविधांवर भर देऊन समस्या मार्गी लावण्याचे काम झपाट्याने होत आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निकाली लागत आहेत. त्या अनुषंगाने नगरसेविका सीता पाटील यांनी खांदा वसाहतीमधील समस्या दूर करण्याची मागणी केली आहे.खांदा वसाहतीत मान्सूनपूर्व नालेसफाईचे काम सुरू आहे. नाल्यात गाळ काढून तो बाहेर टाकण्यात आला आहे, परंतु बर्याच ठिकाणी ती माती उचलण्यात आलेली नाही. पाऊस आल्यानंतर हा गाळ पुन्हा नाल्यात जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याबाबत नगरसेविका सीता पाटील यांनी सिडकोला विचारणा केली. त्यानुसार व्ही. एल. कांबळे यांनी त्वरित ही माती उचलून साफसफाई करण्याची सूचना सहाय्यक अभियंत्यांना केल्या. खांदा वसाहतीतील रस्त्यांच्याबाबत नागरिकांच्या तक्रारी अभियंता कांबळे यांना सांगण्यात आल्या. महापालिकेकडे नोड हस्तांतरण करण्यापूर्वी सर्व रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. सेक्टर 7 मध्ये एका रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून जनजीवन विस्कळीत होत असल्याची वस्तुस्थिती नगरसेविका सीता पाटील यांनी सांगितल्यानंतर त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकण्याची ग्वाही सिडकोकडून देण्यात आली. खांदेश्वर तलाव परिसरात प्रेमीयुगुलांच्या उपद्रवामुळे आजूबाजूच्या सोसायटीतील रहिवासी, तसेच येथे फेरफटक्यासाठी येणार्यांना त्रास होत आहे. त्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. याव्यतिरिक्त पथदिवे, पदपथ, गटारांवरील झाकणे याविषयी चर्चा करण्यात आली. याबाबतही व्ही. एल. कांबळे यांनी सकारात्मक भूमिका घेतली.
RamPrahar – The Panvel Daily Paper