साऊदॅम्प्टन : वृत्तसंस्था
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत घोडदौड करणार्या भारतीय संघाची पुढील साखळी लढत गुरुवारी (दि. 27) वेस्ट इंडिजशी होणार आहे. न्यूूझीलंडविरुद्धच्या निसटत्या पराभवामुळे विंडीजच्या उपांत्य फेरीच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत, परंतु उर्वरित सामन्यांत विजय मिळण्याचा त्यांचा निर्धार आहे. दुसरीकडे, विंडीजला नमवून सेमीफायनलमधील स्थान निश्चित करण्याच्या
दृष्टीने टीम इंडिया मैदानात उतरेल.
कार्लोस ब्रॅथवेटच्या संस्मरणीय खेळीनंतरही वेस्ट इंडिज संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध धक्कादायक पराभव पत्करावा लागला; तर अफगाणिस्तानने झुंजवूनही भारताने सरतेशेवटी मागील सामना जिंकला. उभय संघ पाहता विंडीजकडे धोकादायक खेळाडू आहेत. ते चांगली टक्कर देऊ शकतात. अशा वेळी भारतीय खेळाडूंनी त्यांच्या क्षमतेनुसार खेळ केल्यास विजयाची मालिका कायम राखता येईल.
दरम्यान, वेस्ट इंडिजचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची वार्ता आली आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसला. त्यामुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.