पाली : प्रतिनिधी
सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने सुधागड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी सकाळी पाली, जांभुळपाड्यासह तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले. यंदा मान्सुनचे आगमन उशिरा झाले. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होता. अखेर ही प्रतिक्षा संपली असून शेतीच्या कामांना आता वेग आला आहे. पाली व जांभुळपाडा तसेच तामसोली, आंबा नदीच्या प्रवाहाने वेग धरला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. शुक्रवारी पाण्याचा प्रवाह वाढल्याने आंबा नदीने पाली येथे धोक्याची पातळी ओलांडली. सखोल भागात पाणी शिरले आहे. तर नद्या, नाले, दुथडी भरुन वाहत आहेत. पाली बसस्थानकांला पाण्याने वेढा दिला असून, बसस्थानक परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीस अडसर निर्माण झाला आहे.