नागोठणे : प्रतिनिधी
मागील पाच दिवस संततधार पडणार्या मुसळधार पावसाने येथील अंबा नदीने पहाटे आपले पात्र ओलांडून शहरात प्रवेश केल्याने एसटी बसस्थानक, मरिआई मंदिर परिसर, कोळीवाडा तसेच हॉटेल लेक व्ह्यू परिसरात पुराचे पाणी भरले होते. मंगळवारी पहाटे सहा वाजता भरलेले पुराचे पाणी दुपारी ओसरायला सुरुवात झाली असली, तरी दुपारपर्यंत नदी किनारचा रस्ता पाण्याने व्यापला गेला असल्याने तोपर्यंत वाहतूक काही अंशी विस्कळीतच झाली होती.
एसटी बसस्थानकात पाणी साचल्याने बस थांबा तात्पुरत्या स्वरूपात महामार्गावर हलविण्यात आला होता. पुरामुळे वरवठणे मार्गे रोह्याकडे तसेच जिल्हा परिषदेचा नागोठणे – पेण रस्ता आणि शिवाजी चौकातून महाड बाजूकडे जाणारा रस्ता असे तीनही मार्ग काही तास वाहतुकीस बंद झाले होते. महामार्गावर एसटी बसेस थांबविण्यात येत असल्याने प्रवाशांना तेथे जाण्या – येण्यासाठी मोठा हेलपाटा मारावा लागत होता. सुरक्षेचा उपाय म्हणून येथील शिवाजी चौकात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मंगळवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला असला, तरी पावसाचे प्रमाण रात्री जर वाढले, तर पुराचे पाणी पुन्हा शहरात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या सूचनेनुसार नागोठणे शहरासह विभागातील अनेक शाळांना मंगळवारी सुट्टी देण्यात आली होती. ज्या काही शाळा चालू ठेवण्यात आल्या होत्या, त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तुरळक प्रमाणात उपस्थिती होती. रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत होती. मात्र, सकाळी अकरा वाजता येथील रेल्वे स्थानकावर येणारी रत्नागिरी -दादर पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आल्याने पनवेल, डोंबिवली, कल्याण तसेच मुंबई, नवी मुंबईकडे जाणार्या प्रवाशांना एसटी बस किंवा खासगी वाहनांचा आधार घेऊन मार्गस्थ व्हावे लागले.