नवी मुंबई : प्रतिनिधी
ऐरोली सेक्टर 10 मध्ये कोल्हा फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नागरी वस्तीत वाट चुकून आलेल्या या कोल्ह्याला पकडण्यात प्राणीमित्रांना यश आले.
मंगळवारी (दि. 2) सकाळी हा कोल्हा ऐरोली सेक्टर 10मधील पाण्याच्या टाकीजवळ नेहमीप्रमाणे आला होता. या पाण्याच्या टाकीजवळ एक दीड वर्षाचा मुलगा राहत असल्याने कोल्ह्याचा वावर वाढला होता. कोल्हा आल्याची ही माहिती मिळताच सर्पमित्र अमरजित गुरुंग यांनी या ठिकाणी धाव घेतली, अथक प्रयत्नाने या कोल्ह्याला पकडण्यात आले. त्याला मुंबईच्या प्राणी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सर्पमित्र अमरजित म्हणाले की, ऐरोलीच्या खाडीकिनारी हे कोल्हे आढळतात. भक्ष्याच्या शोधात खाडीतील झाडीतून ऐरोली भागात महिनाभरापासून हा कोल्हा वावरत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. कुत्र्यामुळे हा कोल्हा सेक्टर 10 येथील पाण्याच्या टाकीच्या परिसरात लपला होता. कोल्ह्याचे लक्ष्य हे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक असतात.
हुबेहुबे पाळीव कुत्र्यासारखा कोल्हा दिसतो. सध्या पावसाळा आल्याने ऐरोलीखाडी मार्गातील झाडीतून कोल्हे त्याचप्रमाणे साप, अजगर येऊ शकतात, त्यामुळे रात्रीच्या वेळी लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे, असे काही प्राणी आढळल्यास सर्पमित्र, प्राणीमित्रांना संपर्क साधावा. पुनर्वसु फाऊंडेशन, अमरजीत गुरुंग, संजय रणपिसे, सुरेश खरात, गणेश गोपाले यांना कोल्ह्याला पकडण्यात यश आले.